झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अॅसिड टाकून जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 23:52 IST2025-10-21T23:48:17+5:302025-10-21T23:52:44+5:30
या घटनेत आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत

झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अॅसिड टाकून जाळले
अहमदाबाद - शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या सणात बायकोने संशयाच्या आगीत भयानक पाऊल उचलले आहे. ज्यातून तिच्या पतीचा जळून मृत्यू झाला. ३३ वर्षीय रौनक फूड डिलिव्हरीचे काम करायचा. तो त्याच्या पत्नीसोबत अहमदाबादच्या वेजलपूर येथे राहत होता. या दोघांच्या लग्नाला २ वर्ष झाली होती. परंतु मागील १ वर्षापासून या दोघांमध्ये सातत्याने भांडणे व्हायची.
परस्त्रीसोबत संबंध असल्याचा संशय
रौनकच्या पत्नीला त्याच्यावर संशय होता की, त्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत. त्यातून हळूहळू त्यांच्या नात्यात प्रेमाऐवजी संशयाचे विष पसरत गेले. दिवाळीच्या सकाळी या दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यात पत्नीने पतीला शिवीगाळ सुरू केली. रौनक सणाचा दिवस असल्याने वादापासून दूर होत चादर ओढून झोपून गेला. परंतु पत्नीचा राग अनावर झाला. तिचे स्वत:वरील नियंत्रण सुटले. काही वेळाने उकळतं पाणी घेऊन ती खोलीत आली आणि पतीच्या अंगावर गरम पाणी टाकले. वेदनेने विवळत तो उठून पळाला आणि कपडे काढू लागला. मात्र पत्नीने आणखी एक खतरनाक पाऊल उचलले. तिने अॅसिडने भरलेली बाटली त्याच्या अंगावर फेकली.
ही बाटली अंगावर पडताच रौनक किंचाळला. त्याचे शरीर जळाले, तो खाली जमिनीवर पडला. त्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक धावत आले. त्यांनी हा प्रकार पाहताच तात्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी रौनकला हॉस्पिटलला नेले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सुरुवातीच्या तपासात महिलेने पतीच्या चारित्र्यावर संशय घेत हे कृत्य केल्याचे समोर आले. दिवाळीची रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येते परंतु या घरात वेदना, पश्चातापाची काळरात्र बनली. संशयाने एक नाते कायमचे तोडले.