श्रीगोंदा - दाणेवाडी शिवारातील विठ्ठल मांडगे यांच्या भावाच्या विहिरात मयत माऊली सतीश गव्हाणे याचे शीर, दोन हात, एक पाय अवयव आढळून आले आहेत. त्यामुळे तो मृतदेह माऊलीचाच असल्याचं समोर आल्याने त्याची हत्या झाली आहे. मात्र अद्याप पोलिसांना त्याच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागला नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाने सगळेच दहशतीत आले आहेत.
दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे हा १९ वर्षीय युवक ६ मार्चपासून बेपत्ता होता. पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली होती. ११ मार्चला रात्री माऊली गव्हाणे याचा मृतदेह विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीत सापडला. मात्र त्या मृतदेहाला शीर, दोन हात, एक पाय नव्हता. त्यामुळे हा मृतदेह माऊली गव्हाणे याचा आहे हे पोलिसांना जाहीर करता आले नाही. शुक्रवारी माऊलीचे वडील सतीश गव्हाणे यांचे श्रीगोंदा येथील ग्रामीण रूग्णालयात डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेतले होते.
दरम्यान, शनिवारी विठ्ठल मांडगे यांच्या भावाच्या विहिरीत माऊलीचे शीर, दोन हात आणि एक पाय सापडला. त्यामुळे हा मृतदेह माऊलीचाच असल्याचं स्पष्ट झाले. माऊली गव्हाणे याची इतक्या निर्घृणपणे हत्या कुणी आणि कशासाठी केली याबाबत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्याच्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढला असून त्यातून आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत होईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दगडाने बांधले अवयव
माऊलीची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करणाऱ्यासाठी मारेकऱ्यांनी त्याचे शीर, दोन्ही हात आणि एक पाय बाजूला केला असावा. एका विहिरीत एक पाय आणि मृतदेह तर दुसऱ्या विहिरीत शीर, दोन्ही हात आणि एक पाय असं अवयव टाकण्यात आले. त्या अवयवांना दगड बांधून टाकण्यात आले होते. ही हत्या नाजूक प्रकरण की संपत्तीच्या कारणातून झाली या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
दाणेवाडी सुन्न, गावकऱ्यांची ग्रामसभा
या घटनेने दाणेवाडी येथील ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. ग्रामस्थांनी खुनाचा उलगडा व्हावा यासाठी शुक्रवारी ग्रामसभा घेतली. लवकरात लवकर तपास लावण्याची मागणी गावकऱ्यांनी करत रास्ता रोकोचा इशारा दिला.