पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:52 IST2025-09-16T09:52:09+5:302025-09-16T09:52:54+5:30
साहिलला भेटण्यासाठी त्याची आजी आणि भाऊ बऱ्याचदा जेलला येतात. नातेवाईक त्याला भेटून जातात. परंतु त्यांच्या डोळ्यात घडलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप आणि वेदना दोन्ही दिसून येते असं जेल अधीक्षकांनी म्हटलं.

पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
मेरठ - देशभरात चर्चेत असलेल्या सौरभ हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली आहे. एकेकाळी नशेत धुंद असलेला साहिल आता जेलमध्ये शेती करत आहे. मुस्काननं केलेल्या विश्वासघातामुळे आतून खचलेल्या साहिलच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली. जेलमध्ये राहून तो शेती करत असून दररोज त्यासाठी मेहनत घेत आहे. आज त्याने केलेल्या कृत्यावर त्याला पश्चाताप होत आहे. आयुष्याचा खरा अर्थ काय याची जाणीव त्याला झाली आहे.
जेलमध्ये दरमहिन्याला किती कमाई करतो?
जेलचे पोलीस अधीक्षक वीरेश राज यांनी सांगितले की, साहिलने पूर्णत: नशा करणे सोडून दिले आहे. आता तो शेती करतो. जेल परिसरात उत्पादन केलेल्या पिकांवर देखरेख ठेवत त्यासाठी मेहनत घेतो. शेती करण्याच्या बदल्यात सरकारकडून त्याला प्रतिदिन ४० रूपये दिले जातात. सुट्टी आणि आरामाचा वेळ वगळून त्याला दर महिन्याला ९०० ते १००० रूपये मिळतात. ही रक्कम भलेही किरकोळ वाटत असेल परंतु मेहनतीने कमावलेल्या पैशामुळे साहिलचा आत्मविश्वास वाढला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच साहिल आता आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने शेती करू लागला आहे. त्याला वातावरण, पिकांचे उत्पादन त्याबाबत चांगली माहितीही झाली आहे. बिया पेरणीपासून ते सिंचनापर्यंत प्रत्येक प्रक्रियेत तो स्वत: हिरारीने पुढाकार घेतो. शेतीच्या मातीशी जोडून साहिलला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ कळला आहे असं जेल अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुस्कानशी मैत्री करणे सर्वात मोठी चूक
दुपारच्या भोजनावेळी जेव्हा साहिल इतर कैद्यांसोबत बोलत असतो, त्यावेळी त्याला इतिहासात केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होताना दिसतो. मुस्कानसोबत मैत्री करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. या चुकीमुळे माझ्याकडून गुन्हा घडला आणि जेलच्या या दुनियेत यावे लागले असं तो इतर कैदी मित्रांना सांगत असतो. आता तो सुधारण्याचा प्रयत्न करत आहे असं जेलमधील लोकांनी सांगितले.
दरम्यान, साहिलला भेटण्यासाठी त्याची आजी आणि भाऊ बऱ्याचदा जेलला येतात. नातेवाईक त्याला भेटून जातात. परंतु त्यांच्या डोळ्यात घडलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप आणि वेदना दोन्ही दिसून येते असं जेल अधीक्षकांनी म्हटलं. दुसरीकडे मुस्कान आजही तिच्या नातेवाईकांना भेटण्याची प्रतिक्षा करत आहे. तिच्या भेटीला कुणीच येत नाही.