एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:16 IST2025-11-13T17:15:13+5:302025-11-13T17:16:55+5:30
फॅमिली कोर्टात हे प्रकरण पोहचले तेव्हा पतीची याचिका कोर्टाने फेटाळली. हे प्रकरण क्रूरतेच्या गुन्ह्याखाली येत नाही. त्यानंतर पतीने याविरोधात गुजरात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
गांधीनगर - अहमदाबाद येथे अजब गजब प्रकार समोर आला आहे. एका पतीने पत्नीच्या श्वानप्रेमामुळे तिच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीचे श्वान प्रेम माझ्या आजारपणाचे आणि वैवाहिक जीवनातील तणावाचं कारण असल्याचं सांगत पतीने घटस्फोटाची मागणी केली आहे. फॅमिली कोर्टात पतीने ही याचिका दाखल केली होती, ती कोर्टाने फेटाळल्यानंतर पतीने गुजरात हायकोर्टात याला आव्हान दिले आहे.
पत्नीच्या श्वानप्रेमामुळे नात्यात अंतर
४१ वर्षीय पतीने याचिकेत म्हटलंय की, माझे लग्न २००६ साली झाले होते, परंतु एकेदिवशी पत्नीने रस्त्यावर भटकणारा एका श्वान घरी आणला तेव्हापासून वादाची सुरुवात झाली. हा श्वान आमच्याच बेडवर झोपत होता. जेव्हाही मी पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा श्वान भुंकत राहायचा. एकदा तर श्वानाने मला चावले. मी यावर आक्षेप घेतला तरीही पत्नीने श्वानाला घराबाहेर काढण्यास नकार दिला. त्याच तणावात माझा मानसिक छळ झाला. मला डायबेटिज आणि इरेक्टाइल डिस्फंक्शनसारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे असा आरोप पतीने केला.
इतकेच नाही तर पत्नीने वाढदिवसाच्या दिवशी रेडिओ जॉकीसोबत मिळून माझ्यावर एप्रिल फुल प्रँक केला होता. त्यात माझे कुणी जेनी नावाच्या महिलेशी विवाहबाह्य संबंध आहेत आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे असे खोटे आरोप केले होते. हा रेडिओ प्रँक प्रसारित झाला, त्यामुळे माझी समाजात बदनामी झाली. माझी प्रतिमा मलिन झाल्यानं मला मानसिक त्रास सहन करावा लागला. जेव्हा मी पोलिसांकडे गेलो, त्यांना घेऊन घरी पोहचलो तेव्हा पत्नीने तो केवळ विनोद होता असं म्हटल्याचेही पतीने याचिकेत सांगितले.
दरम्यान, पतीने पत्नीवर हुंड्यासाठी खोटे आरोप लावत असल्याचा दावा केला आहे. जर मी हे नाते मोडले तर तुझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करेन असं पत्नीने धमकावल्याचे पतीने सांगितले. तर पतीने केलेले आरोप खोटे असून तो सातत्याने मला घटस्फोट मागत आहे असं तिने म्हटलं. फॅमिली कोर्टात हे प्रकरण पोहचले तेव्हा पतीची याचिका कोर्टाने फेटाळली. हे प्रकरण क्रूरतेच्या गुन्ह्याखाली येत नाही. त्यानंतर पतीने याविरोधात गुजरात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी करत १ डिसेंबरला पुढची सुनावणी ठेवली आहे.