लोकमत न्यूज नेटवर्कमूल : प्रेमविवाहाला नकार दिल्याने प्रेयसीला संपविण्यासाठी थेट बिहारमधून पिस्तूल विकत आणणाऱ्या प्रियकराला मूल पोलिसांनी अटक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मूल-ताडाळा मार्गावर असलेल्या महाबीज केंद्राजवळ घडली. आरोपीकडून दोन जिवंत काडतुसे व एक देशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली. गौरव नितीन नरुले (२६, रा. वॉर्ड १२ मूल), असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तोही आत्महत्या करणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
मूल पोलिसांचे पथक मूल-ताडाळा मार्गावर गस्त घालत होते. महाबीज केंद्राजवळ एक युवक दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला संशयित अवस्थेत आढळून आला. पोलिसांना शंका आल्याने त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याने गौरव नितीन नरुले हे नाव सांगितले. त्याच्याकडील प्लास्टिक पिशवीची तपासणी केली असता दोन जिवंत काडतुसे व एक देशी बनावटीची पिस्तूल आढळून आल्याने पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोबाइल व एम.एच-३४ सी.ए-७३४२ क्रमाकांची दुचाकी, असा एकूण १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तालुका न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मूल शहरात वाढली गुन्हेगारी ?मूल शहरात वर्षभरापासून गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढताना दिसत आहे. चोरी, हाणामारी व हत्या करण्याच्या घटना घडल्या. गतवर्षी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळी झाडून हत्येचा प्रयत्न झाला होता. मागील ११ महिन्यांत चाकूने भोसकून चौघांची हत्या झाली होती.
बिहारचा पत्ता कुणी दिला?प्रेयसीच्या हत्येसाठी पिस्तूल विकत घेण्यास आरोपीला बिहार राज्यातील पत्ता कुणी सांगितला, हा प्रश्न आता पुढे आला आहे. पोलिसांनी याबाबत सध्या तरी काही माहिती दिली नाही. मूल येथील युवक पिस्तुलासाठी थेट बिहारला जातो, यामागे जिल्ह्यात कुणी एजंट आहेत काय, अशीही नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे. अटकेची कारवाई प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, प्रभारी पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार आत्राम, पोलिस हवालदार भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, पंकज बगडे आदींनी केली.
पिस्तूल घेऊन प्रेयसीची पाहत होता वाटआरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे एका युवतीसोबत प्रेम होते. प्रेमविवाह करण्याचे दोघांनीही ठरविले. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने नकार दिल्याने तो निराशेत होता. या नैराश्यातून त्याने प्रेयसीची हत्या करून स्वतःला संपविण्याचा बेत आखला. त्यासाठी बिहार राज्यातून देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे खरेदी केली. सोमवारी, दि. १ रोजी सायंकाळी प्रेयसीची हत्या करून स्वतःला संपविण्याच्या हेतूने तो महाबीज केंद्राजवळ उभा होता. याचदरम्यान मूल पोलिसांनी अटक केली.