१ वर्षाच्या प्रेमानंतर विष देऊन बॉयफ्रेंडला कायमचं संपवलं; कोर्टानं ठरवलं दोषी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:04 IST2025-01-17T16:03:26+5:302025-01-17T16:04:17+5:30
ग्रीष्मा आणि शेरोन दोघेही खूप जवळ होते परंतु ग्रीष्माचं दुसऱ्या युवकाशी लग्न ठरल्याने नात्यात दुरावा आला.

१ वर्षाच्या प्रेमानंतर विष देऊन बॉयफ्रेंडला कायमचं संपवलं; कोर्टानं ठरवलं दोषी
केरळ - राजधानी तिरुवनंतपुरम इथं स्थानिक न्यायालयाने युवकाच्या हत्येप्रकरणी एका युवतीला दोषी ठरवलं आहे. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी या युवतीने तिचा प्रियकर शेरोजला आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्यायला दिले होते त्यात त्याचा मृत्यू झाला. ११ दिवस युवक हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत होता. २५ ऑक्टोबरला त्याचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपी युवती ग्रीष्माला दोषी ठरवलं असून तिच्या काकालाही सहआरोपी बनवले आहे.
कोर्टाच्या या निकालानंतर मृत युवकाच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. आरोपी ग्रीष्माला शिक्षा मिळेल असा आम्हाला विश्वास होता. आम्ही तिच्या शिक्षेची वाट पाहू परंतु तिच्या आईला या प्रकरणातून दोषमुक्त केले त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे असं युवकाच्या वडिलांनी सांगितले. तर तिने आमच्या मुलाचा जीव घेतला जो आमचं आयुष्य होता. ग्रीष्मा आणि शेरोन दोघेही खूप जवळ होते परंतु ग्रीष्माचं दुसऱ्या युवकाशी लग्न ठरल्याने नात्यात दुरावा आला.
विशेष म्हणजे भविष्यवाणीवर विश्वास ठेवून युवतीने शेरोनसोबत नाते संपवण्याचा निर्णय घेतला. तिचा पहिला पती निधनानंतर ती दुसरं लग्न करेल असं तिला सांगण्यात आले होते. ग्रीष्मा या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून होती तर शेरोन हे चुकीचे असल्याचं सातत्याने सिद्ध करत होता. त्याने एका चर्चेमध्ये ग्रीष्मासोबत लग्नही केले होते असं युवकाच्या नातेवाईकांचा दावा आहे. त्याशिवाय पोलिसांनी तपास वेगळ्या दिशेला नेला, ही पूर्व नियोजित हत्या होती असं कुटुंबाने म्हटलं.
...तेव्हा घटनेला नाट्यमय वळण लागलं
या प्रकरणी ग्रीष्मा जेव्हा पोलिसांच्या तावडीत होती तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेळीच सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. आत्महत्येच्या प्रयत्नासाठी तिच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला. ग्रीष्मावर अपहरण आणि हत्या या गुन्ह्यात दोषी आढळली आहे तर तिचा काका पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. बीएससीच्या अखेरच्या वर्षात शिकणाऱ्या शेरोन राजची भेट कन्याकुमारीतील एका खासगी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ग्रीष्माशी झाली. १ वर्षापासून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवल्याने तिला शेरोनसोबतचं नातं संपावायचं होते.
१४ ऑक्टोबरला शेरोन ग्रीष्माला भेटायला कन्याकुमारीतील तिच्या घरी गेला तिथे कथितपणे ग्रीष्मा आणि तिच्या घरच्यांनी दिलेल्या आयुर्वेदिक औषधात विष मिसळल्याचा आरोप होता. २५ ऑक्टोबरला युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ३१ तारखेला ग्रीष्मा आणि तिच्या कुटुंबातील २ सदस्यांना अटक केलं होतं. अखेर कोर्टाने ग्रीष्मा आणि तिच्या काकांना या प्रकरणी दोषी ठरवलं आहे.