IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:19 IST2025-11-03T15:19:09+5:302025-11-03T15:19:51+5:30
ललिता सिंह हिने आयआयटी कानपूर येथून बीटेकचं शिक्षण पूर्ण केले होते. ती नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती

IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी सोमवारी सकाळी गंगा बंधारा पुलावरून एका युवतीने नदीत उडी मारली आहे. या मुलीचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने सर्च मोहिम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे हे टोकाचं पाऊल उचलणाऱ्या युवतीचं कानपूर आयआयटीमधून बीटेकचं शिक्षण झाले आहे आणि सध्या ती यूपीएससीची तयारी करत होती.
सोमवारी सकाळी साडे सहा ते ७ च्या दरम्यान ही घटना घडली. माहितीनुसार, चांदपूर तहसीलमध्ये काम करणाऱ्या अमीन वेद प्रकाश यांची मुलगी ललिता सिंह शेजारी राहणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीसोबत गंगा बंधाऱ्यावर पोहोचली होती. तिने सोबत आलेल्या मुलीला गेट नंबर २४ वर उभे राहण्यास सांगितले त्यानंतर तिने गंगेत उडी घेतली. त्यानंतर सोबत आलेल्या मुलीने आरडाओरड सुरू केला तेव्हा आसपासचे लोक तिथे जमले.
तणावात होती ललिता सिंह
ललिता सिंह हिने आयआयटी कानपूर येथून बीटेकचं शिक्षण पूर्ण केले होते. ती नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती. आयएएस अधिकारी बनणे तिचे स्वप्न होते. त्यासाठी तिने UPSC परीक्षा देण्याचे तीनदा प्रयत्न केले होते. मात्र निवड न झाल्याने ती तणावात होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंगेत उडी घेतलेल्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ललिता सिंह दररोज प्रमाणे घरातून मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती. ललिताने २०२२ साली कानपूर आयआयटीतून बीटेक पूर्ण केले होते. त्यानंतर यूपीएससीच्या तयारीसाठी ती २ वर्ष दिल्लीत होती. १३ ऑक्टोबरला तिने परीक्षा दिली होती, त्यात तिला अपयश आल्याचं कुटुंबाने म्हटलं.
दरम्यान, स्थानिक लोकांनी गंगा बंधाऱ्यावर उंच रॅलिंग करण्याची मागणी केली आहे जेणेकरून अशा घटना रोखल्या जातील. याआधीही अनेकांनी या जागेवरून उडी घेत स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यांपूर्वी एका फौजीच्या पत्नीने तिच्या मुलीसह याठिकाणी उडी घेतली होती. त्यानंतर काहीच दिवसांनी फौजीनेही याच ठिकाणी उडी मारली. या सर्वांचा अद्यापही शोध लागला नाही.