रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:46 IST2025-10-29T16:45:13+5:302025-10-29T16:46:43+5:30
६ ऑक्टोबर रोजी झालेल्या UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या रामकेश मीणा यांच्या मृत्यू प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी थरारक खुलासा केला आहे.

रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
दिल्लीतील तिमारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गांधी विहार परिसरात ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या रामकेश मीणा यांच्या मृत्यू प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी थरारक खुलासा केला आहे. सुरुवातीला पोलीस या घटनेला एसी स्फोटामुळे झालेला अपघात मानत होते. मात्र, जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे हे प्रकरण अपघाताचे नसून, जीवघेण्या हत्येचे असल्याचे सिद्ध झाले. या हत्येप्रकरणी रामकेशच्या गर्लफ्रेंडसह तिच्चा एक्स-बॉयफ्रेंड आणि अन्य एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
फ्लॅटमध्ये आढळला जळालेला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी गांधी विहार परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली, पण तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते.
यादरम्यान फ्लॅटची तपासणी केली असता, रामकेश मीणा यांचा जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. प्रथमदर्शनी, पोलिसांनी हा अपघात एसी स्फोटामुळे झाला असावा, असे मानले होते.
सीसीटीव्हीने उघडले हत्येचे रहस्य
मृतदेहाची अवस्था आणि खोलीची परिस्थिती पाहून पोलिसांना संशय आला. तपासणी पुढे सरकवत पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. ५ ऑक्टोबरच्या रात्रीच्या फुटेजमध्ये दोन मास्कधारी तरुण इमारतीत प्रवेश करताना दिसले. त्यानंतर पहाटे २ वाजून ५७ मिनिटांनी एक युवती त्यापैकी एका मास्क घातलेल्या तरुणासोबत बाहेर येताना दिसली. यानंतर काही वेळातच रामकेशच्या फ्लॅटमध्ये आग लागली होती.
त्या मास्क घातलेल्या व्यक्तीसोबत बाहेर पडलेली ती युवती दुसरी कोणी नसून, रामकेश मीणा यांची लिव्ह-इन पार्टनर अमृता चौहान होती. पोलिसांनी अमृताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल बंद होता. पोलिसांनी घटनेच्या दिवशी तिच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, ते गांधी विहार परिसरातच आले होते. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांचा अमृतावरील संशय वाढला. पोलिसांनी अमृताला पकडण्यासाठी मुरादाबादमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले.
अखेरीस १८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अमृताला अटक केली. पोलिसांनी चौकशी करताच तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने आपल्या साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिच्या एक्स-बॉयफ्रेंडसह अन्य एका साथीदाराला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
गळा दाबून, तेल टाकून जाळण्याचा प्रयत्न
अमृता आणि तिच्या एक्स-बॉयफ्रेंडने मिळून रामकेशच्या हत्येची संपूर्ण योजना आखली होती. तिन्ही आरोपींनी मिळून सर्वात आधी रामकेशचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहावर तेल, तूप आणि दारू टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
इथेच पोलिसांना संशय आला!
पुरावे नष्ट करून हत्येचा बनाव अपघात असल्याचं दाखवण्यासाठी आरोपींनी गॅस सिलेंडरचा व्हॉल्व्ह उघडून आग लावली होती. मात्र, तपास करताना रामकेशचा मृतदेह असामान्यरित्या जास्त जळालेला आढळला. मृतदेह इतका जळाला होता की, काही हाडेही वितळली होती. त्यामुळे पोलिसांना हा अपघात नसून, पूर्वनियोजित हत्या असल्याचा संशय आला.