बीडमध्ये जुन्या वादातून गोळीबार; भाच्याने मारलेली गोळी मामाच्या पायात घुसली
By सोमनाथ खताळ | Updated: June 16, 2023 23:16 IST2023-06-16T23:16:45+5:302023-06-16T23:16:57+5:30
घटनेची माहिती मिळताच नगर रोड परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

बीडमध्ये जुन्या वादातून गोळीबार; भाच्याने मारलेली गोळी मामाच्या पायात घुसली
बीड - जुन्या भांडणाच्या कारणावरून मामा-भाचामध्ये वाद झाला. यात दोन्ही गटाचे लोक जमा झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर गोळीबार करण्यात आला. यात मामा जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बीड शहरातील कालीकानगर भागात शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली.
शहरातील नगर रोडवरील कालिकानगर भागात जाधव नावाचा भाचा राहतो. तर पेठबीड भागात गायकवाड नावाचा मामा राहतो. या दोघांमध्ये जुन्या भांडणातून शुक्रवारी वाद झाले. त्यानंतर दोघांनीही आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेत हाणामारी केली. त्यानंतर दोघांनीही हवेत गाेळीबार करत दहशत निर्माण केली. तर त्यातीलच जाधव नामक व्यक्तिने गायकवाडवर गोळी झाडली. ही गोळी गायकवाडच्या पायाला चाटून गेली असून ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नगर रोड परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर व विशेष पथके रवाना झाली होती. गोळीबार केल्यानंतर सर्वच लोक फरार झाले होते. जखमीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.