MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 09:31 IST2025-04-30T09:30:34+5:302025-04-30T09:31:07+5:30
हिसारच्या हॉस्पिटलमधून तिला जयपूरच्या रुग्णालयात आणले गेले. तिथे उपचारावेळी तिचा मृत्यू झाला.

MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
हिसार - राजस्थानच्या अनंतपुरा येथील युवती डॉ. भावना यादव हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भावना हरियाणाच्या हिसारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडली. तिला जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिथे तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपासात हिसार इथल्या कृषी विद्यापीठात क्लर्क म्हणून नोकरी करणाऱ्या युवकाच्या घरातून पेट्रोलची बाटली आणि इतर गोष्टी सापडल्या. हा तोच युवक होता ज्याने भावनाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सध्या हा युवक फरार असून त्याचा फोनही बंद आहे.
नातेवाईकांनी सांगितले की, भावना दिल्लीत ऑनलाईन क्लास घ्यायची, परीक्षा देण्यासाठी ती कायम दिल्लीला जात होती. २१ एप्रिलला ती परीक्षेसाठी दिल्लीला गेली. तिच्याशी फोनवर बोलणे व्हायचे, ती पूर्णपणे ठीक होती. कुठलेही टेन्शन नव्हते. २४ एप्रिलला आम्हाला एका युवकाचा फोन आला ज्याने भावना आगीत भाजली असून तिला हिसारच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे असं कुटुंबाला सांगितले. तातडीने तिच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला धाव घेतली तेव्हा भावनाची प्रकृती चिंताजनक होती. हिसारच्या हॉस्पिटलमधून तिला जयपूरच्या रुग्णालयात आणले गेले. तिथे उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करून दोषीला शिक्षा द्यावी अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे.
मृत युवतीच्या आईने पोलिसांकडे वेगळाच संशय व्यक्त केला आहे. मुलीच्या पोटावर जखमा दिसत होत्या, एखाद्या धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला असावा असं आईने सांगितले. जयपूर येथे पोलिसांनी गुन्हा दाखल करून हिसारच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याकडे तपास वर्ग केला आहे. पोलीस भावनाच्या फोनचा तपास घेत आहेत. तिच्या मित्रांची चौकशी करत आहेत. भावनासोबत मारहाण झाली असावी असं तिच्या शरीरावरील जखमांकडे पाहून दिसून येते.
दरम्यान, ज्या युवकाने तिला रुग्णालयात दाखल केले, त्याच्या घरी पोलिसांना पेट्रोलची बाटली आणि अन्य ज्वलनशील साहित्य सापडले आहे. घटनेपासून संबंधित युवक फरार आहे. त्याने फोनही बंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी ३ पथके बनवली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: या विषयावर लक्ष ठेवून आहेत. संशयित युवक उमेश यादव ज्याने भावनाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्याचा शोध घेतला जात आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.