पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना
By सदानंद सिरसाट | Updated: May 16, 2024 22:02 IST2024-05-16T22:01:33+5:302024-05-16T22:02:30+5:30
याप्रकरणी पत्नीला माहीत असतानाही तिने नवऱ्याच्या खुनाची माहिती दिली नाही

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना
सदानंद सिरसाट, लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (बुलढाणा): गेल्या आठ दिवसांपूर्वी मारहाण प्रकरणात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पत्नीला माहीत असतानाही तिने नवऱ्याच्या खुनाची माहिती न दिल्याने पत्नीसह इतर दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
याप्रकरणी संप्रदाय नगर (रोकडिया नगर) परिसरातील रहिवासी लक्ष्मण वासुदेव मानकर यांना जखमी अवस्थेत ८ मे रोजी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात माहिती देताना मृतकाची पत्नी नलिनी लक्ष्मण मानकर (५०) हिने गाडीवरून पडल्याने जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासात मृतकाला मारहाण केल्याचे पुढे आले.
त्यानुसार मृतक लक्ष्मण हा पत्नी नलिनीला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्याचा जाब विचारण्यासाठी आलेला पत्नीचा भाऊ सुटाळा बु. येथील गोपाल ऊर्फ नारायण उकर्डा वाघ (५०) हा त्याचा मित्र आवार येथील बाळकृष्ण रामकृष्ण वांडे (५५) याच्यासह आला. त्यावेळी त्यांनी मृतकाला काठीने हातापायावर डोक्यावर मारून जबर जखमी केले. तसेच उपचारासाठी केले.
दरम्यान, लक्ष्मण मानकरचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाची पत्नी नलिनी हिने रुग्णालयात खोटी माहिती दिली. तसेच दोन्ही आरोपींना सहकार्य केले. यावरून पोलिसांनी तीनही आरोपीविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोनि हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरिक्षक आयरे करीत आहेत.