कोरोना काळात रेमेडीसीवर मागवून रुग्णाला फसवल्या प्रकरणी डॉक्टर, औषध विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 09:13 AM2022-03-02T09:13:04+5:302022-03-02T09:13:46+5:30

रुग्णानं पोलिसांत केली तक्रार.

A case has been registered against a doctor and a medical store guy for cheating a patient remdesivir coronavirus pandemic | कोरोना काळात रेमेडीसीवर मागवून रुग्णाला फसवल्या प्रकरणी डॉक्टर, औषध विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

कोरोना काळात रेमेडीसीवर मागवून रुग्णाला फसवल्या प्रकरणी डॉक्टर, औषध विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

Next

मीरारोड - कोरोना महासाथीच्या काळात रेमेडीसीवर इंजेक्शनचा रुग्णालयातच काळाबाजार झाल्याचा प्रकार भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केअर रुग्णालयात घडला असून तेथील डॉक्टर व रुग्णालयातील औषध दुकानाच्या विक्रेत्यावर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मीरारोडच्या शिवार उद्यान समोरील ओस्तवाल पॅरेडाइजमध्ये राहणाऱ्या शाहीन खान यांचे पती लियाकत अली हे कोविडची लागण झाल्याने सेव्हन स्क्वेकर शाळेसमोरील फॅमिली केअर रुग्णालयात १८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२० दरम्यान उपचारासाठी दाखल होते. उपचारासाठी त्यांनी मेडिक्लेमची कागदपत्रे सादर केली होती. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी शाहीन यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादीमध्ये, त्यांच्या पतीवर डॉ. अजित आव्हाड हे उपचार करत होते. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या नंतर डॉ. आव्हाड यांनी ६ रेमेडिसिवर इंजेक्शन आण्यासाठी प्रिस्कीप्शन दिले. त्यानुसार त्यांनी रुग्णालयातील औषधाच्या दुकानातून प्रत्येकी ५ हजार ४०० रुपये एक इंजेक्शन प्रमाणे ६ इंजेक्शन खरेदी केली व डॉक्टरांना दिली. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी २ इंजेक्शन व त्या नंतर आणखी १ इंजेक्शनची मागणी केली असता ती सुद्धा आणून दिली. असे एकूण ९ इंजेक्शन शाहीन यांनी खरेदी करून डॉक्टरांना दिली. परंतु २ दिवसांनी त्यांना औषध दुकानातून पतीच्या नावे आणखी २ इंजेक्शन देण्यात आल्याचे सांगण्यात आले व त्याचे पैसे मागितले. शाहीन यांनी औषध विक्रेत्यास डॉ. आव्हाड यांनी आणखी इंजेक्शनची प्रिस्क्रिप्शन दिली नसून तुम्ही प्रिस्किप्शन दाखवा अशी मागणी केली. त्यावर औषध विक्रेत्यानं डॉ. दिलीप पटेल यांच्या नावे असलेले प्रिस्क्रिप्शन दाखवले.

शाहीन यांनी आपल्या पतीवर डॉ. आव्हाड उपचार करत असताना डॉ. पटेल यांचा संबंध काय? असा सवाल केला असता विक्रेत्याने तुम्ही डॉक्टरांना विचारा मला इंजेक्शनची पैसे द्या असे सांगितले. त्यामुळे शाहीन यांनी पैसे दिले. त्यानंतर डॉ. पटेल यांनी स्वतःच्या नावाचे प्रिस्कीप्शन देत टॉसिझूलीमॅब व आणखी एक अन्य अशी २ इंजेक्शन तात्काळ घेवून या नाहीतर रुग्ण दगाऊ शकतो अशी भीती दाखवली. रुग्णालयातील औषध दुकानात ती इंजेक्शन नसल्याने शाहीन इतरत्र प्रयत्न करू लागल्या. त्यावेळी रुग्णालयातील एका डॉक्टरने डॉ . पटेल यांनी दिलेले प्रिस्कीप्शन पाहुन सदर इंजेक्शनची आवश्यकता नाही असे सांगितले. शाहीन यांनी सदरची बाब डॉ. आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी रुग्णालयाचे संचालक डॉ . जगदीश भवानी यांना भेटून डॉ . दिलीप पटेल हे औषध दुकानाच्या व्यवस्थापकाच्या संगनमताने रुग्णांची लूट करत असल्याचे सांगा असा सल्ला दिला. डॉ. आव्हाड यांनी फक्त ९ इंजेक्शन मागविली असताना डॉ. पटेल यांनी २ इंजेक्शन तसेच इतर काही गोळ्या त्यांच्या नावाने परस्पर औषध दुकानातून मागवल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. 

एकूण ११ पैकी ६ रेमीडीसीवर इंजेक्शन आपल्या पतीना देण्यात आली होती. इतर ५ इंजेक्शन व गोळ्या यांचा वापर करण्यात आला नसल्याचे लक्षात आल्याने शाहीन यांनी डॉ. जगदीश भवानी यांना समक्ष भेटून तक्रार केली असता त्यांनी डॉ. सोमिया यांना भेटण्यास सांगितले. परंतु डॉ  सोमिया यांनी मेडिक्लेम असल्याने ते मंजूर होईल, काळजी करू नका असे उत्तर दिले . तर डॉ. पटेल यांनी आपण औषधे मागवलीच नाही, औषध दुकानवाल्यास विचारा असे सांगितले. औषध दुकानाच्या व्यवस्थापक त्रिवेणी यांनी मात्र डॉक्टर यांच्या प्रिस्किप्शन शिवाय औषधे देत नाही असे उत्तर दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे . ६५ हजारांच्या औषधांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी डॉ. दिलीप पटेल व त्रिवेणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य व अन्य आरोपीदेखील यातून येण्याची शक्यता व्यक्त होत असून या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.

Web Title: A case has been registered against a doctor and a medical store guy for cheating a patient remdesivir coronavirus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.