हॉटेलच्या काऊंटरवर कॅशिअरचाच डल्ला, बोरिवली पोलिसात गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Updated: November 18, 2023 16:59 IST2023-11-18T16:58:40+5:302023-11-18T16:59:28+5:30
अजय शेट्टी (४२) यांचे बोरिवलीच्या चिकूवाडी मध्ये द ग्रीन किचन नावाने हॉटेल आहे. या ठिकाणी जवळपास ४० जण काम करतात.

हॉटेलच्या काऊंटरवर कॅशिअरचाच डल्ला, बोरिवली पोलिसात गुन्हा दाखल
मुंबई: हॉटेलच्या कॅश काउंटरमधून रोकड लंपास करण्यात आली. हा प्रकार तिथे काम करणाऱ्या कॅशिअरने केल्याचे उघड झाल्यानंतर बोरिवली पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
तक्रारदार अजय शेट्टी (४२) यांचे बोरिवलीच्या चिकूवाडी मध्ये द ग्रीन किचन नावाने हॉटेल आहे. या ठिकाणी जवळपास ४० जण काम करतात. तर आरोपी कॅशियर शिवा गुप्ता (२४) याला त्यांनी ऑक्टोबर,२०२३ मध्ये कामावर ठेवले होते. दरम्यान १६ नोव्हेंबर रोजी शेट्टी यांना हॉटेलचा मॅनेजर उत्तम दास यांनी फोन करत गुप्ताने हॉटेलच्या कॅश काउंटर मधून पैसे चोरत पळ काढण्याचे कळवले.
शेट्टी यांनी हॉटेलमध्ये येत त्यातील रोकड मोजली ज्यात जवळपास ४५ हजार रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून मग त्यांनी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा त्यामध्ये शिवा हा २.१४ वाजण्याच्या सुमारास कॅश काउंटरमधून पैसे चोरून नेताना त्यांना दिसला. त्यांनी आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
एका गार्डनमध्ये तो दारू पित बसलेला त्यांना दिसला. यावर हॉटेलच्या कॅश काउंटरमधून पैसे का घेतले अशी विचारणा त्यांनी शिवाला केली. मात्र त्याने शेट्टींना उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली. अखेर शेट्टींनी शिवाला पकडून पोलीस ठाण्यात आणले आणि त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.