खुलासा! फक्त श्वानांसाठी राखीव ठेवला एक बंगला; निकटवर्तीयाकडे सापडलं मोठं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:04 IST2022-07-25T13:02:48+5:302022-07-25T13:04:17+5:30
६९ वर्षीय टीएमसीचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्याकडे आणखी काही मालमत्ता आहे. त्याचसोबत पार्थ आणि अर्पिता यांनी संयुक्तरित्या शांती निकेतन येथे एक अपार्टमेंट घेतली होती

खुलासा! फक्त श्वानांसाठी राखीव ठेवला एक बंगला; निकटवर्तीयाकडे सापडलं मोठं घबाड
कोलकाता - पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीकडून तपास सुरू आहे. त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. ईडीच्या चौकशीत मंत्री पार्थ चॅटर्जी यांचं डायमंड सिटीमध्ये आणखी ३ बंगले असल्याचं समोर आले. हे बंगले पूर्णत: वातानुकुलनित आहेत. इतकेच नाही तर यातील एक लग्झरी फ्लॅट असाही आहे ज्यात पार्थ चॅटर्जी यांच्या पाळीव श्वानांना ठेवले जाते. पार्थ हे प्राणीमित्र आहेत. त्यामुळे एक बंगला केवळ त्यांच्या कुत्र्यांसाठी राखीव ठेवला आहे.
ED आता पश्चिम बंगालमधील मंत्री पार्थ चॅटर्जी(partha chatterjee) यांची सखोल चौकशी करत आहे. तपासात समोर आलंय की, पार्थ यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. सूत्रांनुसार, पार्थ चॅटर्जी यांच्याकडे फ्लॅट नंबर १८ डी, १९ डी आणि २० डी हे मालकीचे बंगले आहेत. हे ३ फ्लॅट डायमंड सिटीत आहेत. याठिकाणी एका बंगल्यात अभिनेत्री अर्पिता मुखर्जी राहत होती. जिच्या घरातून २१ कोटी २० लाख रुपये रोकड आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
६९ वर्षीय टीएमसीचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्याकडे आणखी काही मालमत्ता आहे. त्याचसोबत पार्थ आणि अर्पिता यांनी संयुक्तरित्या शांती निकेतन येथे एक अपार्टमेंट घेतली होती. शांती निकेतनमधील ७ घर आणि अपार्टमेंटचीही ईडी चौकशी करणार आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने पार्थ यांची २६ तास चौकशी करून त्यांना अटक केली. अटकेनंतर पार्थ यांची तब्येत ढासलली तेव्हा कोलकाता येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथून आता SSKM रुग्णालयात त्यांना रेफर केले आहे.
अर्पिताच्या घरी सापडला नोटांचा ढिग
ईडीने पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांनाही अटक केली होती. अर्पिता यांच्या घरातून तब्बल २१ कोटी २० लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. अर्पिता यांच्या घरातील रोकड पाहून सगळेच अवाक् झाले. नोटा मोजण्याच्या २ मशिनने दोन दिवस अर्पिता यांच्या घरी नोटांची मोजणी सुरू होती. त्याचसोबत अर्पिताच्या घरातून ७९ लाखाचे सोने आणि ५४ लाख रुपये परदेशी नोटा आढळून आल्या आहेत.