पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 10:30 IST2025-09-13T10:29:25+5:302025-09-13T10:30:14+5:30
फुलेवाडी रिंगरोड येथील घटना, आठ जणांवर गुन्हा दाखल

पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
कोल्हापूर : पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून आदित्य शशिकांत गवळी यांचसह आठ जणांनी महेश राजेंद्र राख (वय २३, रा. फुलेवाडी रिंगरोड, अहिल्याबाई होळकर नगर, कोल्हापूर) याचा तलवार, फायटर, एडका, लोखंडी पाईपने मारहाण करून निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास फुलवाडी रिंग रोड येथील महेश राख यांच्या घरात घडली हल्लेखोरांनी बियरच्या बाटल्या आणि दगड घरावर फेकून परिसरात प्रचंड दहशत माजवली. महेश राख याचा खून करून पळालेल्या आठ जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सिद्धांत शशिकांत गवळी, आदित्य शशिकांत गवळी (दोघे रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड), धीरज शर्मा (रा. रामानंदनगर) ऋषभ साळोखे-मगर (रा. पाचगाव), मयूर कांबळे (रा. साने गुरुजी वसाहत), पियुष पाटील (रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर), सद्दाम कुंडले (रा. बी. डी. कॉलनी, कोल्हापूर) यासह एका अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल झाला. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आदित्य गवळी याच्या बायकोला महेश राख याने फूस लावून पळवून नेले होते. यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आदित्य गवळी आणि सिद्धांत गवळी हे दोघे सख्खे भाऊ इतर सहा मित्रांना घेऊन महेश राख त्याच्या घरी गेले. घरावर दगड आणि बियरच्या बाटल्या फेकत ते घरात घुसले. त्यानंतर तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी पाईपने मारहाण करीत महेश राख याचा खून केला.
महेश राख याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच सर्व हल्लेखोर निघून गेले. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. कुटुंबीयांनी तातडीने महेश याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागाचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्यासह करवीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोरांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. सर्व हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.