हॉटेल रुम नं २०३ च्या बाथरुममध्ये आढळला मृतदेह; लष्करी जवानाच्या मृत्यूने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:41 IST2023-02-07T14:41:01+5:302023-02-07T14:41:41+5:30
मंगळवारी जेव्हा सकाळी साफसफाई करण्यासाठी कर्मचारी त्याच्या रुमबाहेर गेला तेव्हा जवानने दरवाजा उघडला नाही.

हॉटेल रुम नं २०३ च्या बाथरुममध्ये आढळला मृतदेह; लष्करी जवानाच्या मृत्यूने खळबळ
अंबाला - भारतीय सैन्यातील जवानाने हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनीश कुमार सिंह असं या जवानाचं नाव आहे. तो केरळचा रहिवासी होता. १ फेब्रुवारीपासून अनीश या हॉटेलमध्ये थांबला होता. मंगळवारी हॉटेल कर्मचारी जेव्हा साफसफाई करण्यासाठी रुम नंबर २०३ मध्ये गेला तेव्हा अनीशने दरवाजा उघडला नाही.
हॉटेल कर्मचाऱ्याने याची माहिती मॅनेजरला दिली. त्यानंतर पोलीस आणि सैन्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. लष्कर आणि पोलीसचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीने दरवाजा उघडला तेव्हा सैन्याच्या जवानाचा मृतदेह बाथरुमच्या ग्रीलला लटकलेल्या अवस्थेत सापडला. तातडीने हा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली. मृत जवानाच्या गळ्याला ओढणी होती. त्यानेच फास बनवत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवान घरी जात असल्याचं सांगत सुट्टीवर गेला होता. परंतु अनीश घरी न जाता हॉटेलमध्ये थांबला होता. अनीशच्या मृत्यूची सूचना त्याच्या घरच्यांना देण्यात आली आहे. तर अनीश कुमार सिंहने रुम बुक करण्यावेळी त्याला २ दिवस हॉटेलमध्ये थांबायचं आहे असं सांगत त्यानंतर त्याची केरळची फ्लाईट आहे असं म्हटलं होते. २ दिवसानंतर त्याने रुमची बुकिंग आणखी वाढवले. मंगळवारी जेव्हा सकाळी साफसफाई करण्यासाठी कर्मचारी त्याच्या रुमबाहेर गेला तेव्हा जवानने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली.
दरम्यान, अनीश कुमार सिंहचा मृतदेह अंबाला कॅंटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. जवानाच्या नातेवाईकांना सूचना देण्यात आली आहे. जेव्हा ते लोक अंबालाला पोहचतील तेव्हा मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले जाईल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अशी माहिती तपास अधिकारी जीत सिंह यांनी दिली.