"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 19:17 IST2025-11-06T19:17:12+5:302025-11-06T19:17:48+5:30
मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तिचा पती श्रीकांत कामावरून परतला तेव्हा घरात असलेल्या शांततेमुळे तो चिंतेत पडला

"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या एका अजब आणि धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हैराण केले आहे. याठिकाणी मुंग्याच्या भीतीने २५ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचललं आहे. मनीषा असं मृत महिलेचे नाव आहे. पती आणि लहान मुलीला मागे सोडून मनीषाने आत्महत्या केली त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तेलंगणाच्या अमीनपूर नगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व होम्स येथे ही घटना घडली. जिथे मनीषा पती श्रीकांत आणि मुलगी अन्वीसोबत राहत होती.
मनीषा मायरमेकोफोबियाने ग्रस्त होती जो एक गंभीर मानसिक आजार आहे. ज्यात तिला मुंग्यांची प्रचंड दहशत वाटत होती. ही फक्त एक साधी भीती नव्हती तर एक असा आजार होता ज्याने तिचे जीवन जिवंत नर्क बनवलं होतं. तिच्या कुटुंबाने या मानसिक समस्येवर उपचार आणि समुपदेशनाचा उपचार सुरू केला होता. परंतु भीतीचं सावट तिच्यावर इतके खोलवर रुजले होते, त्यावर मात करणे तिला अशक्य वाटू लागले.
बेडरूमचा दरवाजा तोडला, अन् आतमध्ये....
मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तिचा पती श्रीकांत कामावरून परतला तेव्हा घरात असलेल्या शांततेमुळे तो चिंतेत पडला. बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारून आणि ठोठावूनही मनीषाने प्रतिसाद न दिल्याने अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडताच आतील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. मनीषा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.
तेलंगणा पोलिसांना मनीषाची सुसाईड नोट सापडली
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेलंगणा पोलिसांना मनीषाची सुसाईड नोट तिच्या खोलीत सापडली, ज्यामध्ये तिच्या वेदनेचे कारण दिले होते. तिने तिच्या पतीला उद्देशून लिहिले, श्री, मला माफ कर..मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही असं तिने म्हटलं होते. तर मुलगी अन्वीसाठी शेवटचा संदेश होता, मुलीची काळजी घ्या असं तिने सांगितले. मनीषाच्या सुसाईड नोटने संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.