शिक्षणासाठी शहरात आलेली, परधर्मीय युवकाने २० वर्षीय विवाहितेला पळविले
By शीतल पाटील | Updated: February 13, 2023 22:13 IST2023-02-13T22:12:34+5:302023-02-13T22:13:02+5:30
युवक सांगलीतीलच असल्यामुळे पोलिसांनी तेथे जावून विवाहितेस पोलीस ठाण्यात आणले आणि तिची रवानगी सुधारगृहात केली आहे.

शिक्षणासाठी शहरात आलेली, परधर्मीय युवकाने २० वर्षीय विवाहितेला पळविले
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शहरातील एका वीस वर्षीय विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून परधर्मीय युवकाने पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. विवाहितेच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाणे गाठून दाद मागितली. अखेर पोलिसांनी विवाहितेला ताब्यात घेऊन तिची सुधारगृहात रवानगी केली.
याबाबत हिंदु सकल समाजचे नेते माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी विवाहितेला न्याय मिळण्यासाठी पुढाकार घेतला. शिंदे म्हणाले की, शहरातील विवाहितेचा राजस्थान येथील युवकासोबत विवाह झाला आहे. ती शिक्षण पूर्ण करण्यासाठी सांगलीत आहे. एका परधर्मीय युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. रविवार १२ रोजी युवकाने विवाहितेस पळवून नेले. सोमवारी सकाळी विवाहितेचे पालक न्याय मागण्यासाठी आमच्याकडे आले होते. यानंतर हिंदु सकल समाजच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत देशमुख यांची भेट घेवून त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडली.
युवक सांगलीतीलच असल्यामुळे पोलिसांनी तेथे जावून विवाहितेस पोलीस ठाण्यात आणले आणि तिची रवानगी सुधारगृहात केली आहे. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.