२ टर्मच्या आमदारानं पत्नीला सोबत घेत मंत्र्यांच्या बहिणीला गंडवलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:43 IST2025-01-23T13:41:15+5:302025-01-23T13:43:52+5:30
कोर्टाकडून सुभाष पासी आणि रिना पासी यांच्याबाबत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले

२ टर्मच्या आमदारानं पत्नीला सोबत घेत मंत्र्यांच्या बहिणीला गंडवलं; नेमकं काय घडलं?
लखनौ - गाजीपूर सैदपूर इथं २ वेळा समाजवादी पक्षाकडून आमदार राहिलेले आणि विद्यमान भाजपा युतीचा घटक पक्ष निषाद पक्षात असलेले सुभाष पासी आणि त्यांची पत्नी रिना पासीला अटक करण्यात आली आहे. हरदोई पोलिसांनी या दोघांना अटक केली. सुभाष पासी आणि त्यांच्या पत्नीवर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री नितीन अग्रवाल यांच्या बहिणीला फ्लॅट देण्याच्या नावाखाली ४९ लाख रुपयांना फसवल्याचा आरोप आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
माहितीनुसार, मंत्री नितीन अग्रवाल यांची बहीण रूची गोयल यांच्याकडून सुभाष पासी आणि त्यांची पत्नी रिना यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत गुन्हा नोंदवून कोर्टात चार्जशीटही दाखल केली. त्यानंतर कोर्टाकडून सुभाष पासी आणि रिना पासी यांच्याबाबत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक करून कोर्टात हजर केले आहे.
काय आहे प्रकरण?
२०२३ मध्ये प्रकाश चंद्र गुप्ता यांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलं होतं की, मुंबईतील आमचे शेजारी अक्षय अग्रवाल यांच्या माध्यमातून गाजीपूर येथील सुभाष पासी यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी सुभाष पासी यांनी मुंबईच्या आराम नगर भागात अडीच कोटीचा फ्लॅट खरेदी करण्याची ऑफर दिली. त्यानंतर प्रकाश यांनी सुभाष पासी यांची भेट मंत्री नितीन अग्रवाल यांची बहीण रूची गोयल यांच्याशी करून दिली. रूची यांनीही फ्लॅटसाठी सुभाष पासी यांना ४९ लाखांचा चेक दिला. रिनाने तिच्या अकाऊंटला पैसे घेतले परंतु फ्लॅट दिला नाही. त्यानंतर फ्लॅटचे बनावट कागदपत्रे बनवून देण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी ३१ जानेवारी २०२४ रोजी खटला दाखल झाल्यापासून पोलीस सुभाष पासी आणि त्याच्या पत्नीचा शोध घेत होती. अखेर पोलिसांनी या दोघांना अटक केली. सुभाष पासी हे गाजीपूरच्या सैदपूर विधानसभा मतदारसंघात २ वेळा आमदार राहिले आहेत. २०१२ आणि २०१७ साली ते सैदपूरमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. २०२२ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.