१२ वर्षांच्या पोटच्या पोराचा चिरला गळा, बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 06:33 IST2023-02-17T06:32:41+5:302023-02-17T06:33:07+5:30

मृतदेह नाल्यात फेकण्याचा केला प्रयत्न

A 12-year-old boy's throat was cut | १२ वर्षांच्या पोटच्या पोराचा चिरला गळा, बापाला अटक

१२ वर्षांच्या पोटच्या पोराचा चिरला गळा, बापाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ स्वामीनगर परिसरात राहणाऱ्या एका बापाने १२ वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक रहिवाशांनी त्याला पाहिले आणि पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

स्वामीनगर परिसरात राहणारा आनंदकुमार गणेश हा गटार व चेंबर साफ करण्याचे काम करतो. त्याचा मुलगा आकाश हा रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावत होता. बुधवारी रात्री डीएमसी कंपनीजवळ गणेशने मुलगा आकाश याचा गळा चिरून त्याची हत्या केली व मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न केला. गणेश कुटुंबापासून वेगळा राहत असल्याने त्याच्या मनात मुलांविषयी राग असल्याचे  स्थानिकांनी सांगितले. आकाश आईच्या भाजी विक्रीच्या व्यवसायात मदत करायचा. यासोबतच  हमालीचे कामदेखील करत होता. स्टेशन परिसरात त्याचा वावर होता.

आनंदकुमार याचे त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत जमत नसल्यामुळे तो वेगळा राहत होता. त्याची पत्नी आणि एक मुलगी आणि मुलगा हे एकत्रित व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असल्याचा राग त्याच्या मनात होता.

आनंदकुमार हा व्यसनाधीन झाल्याने त्याला सतत पैशांची गरज भासत असल्याने तो चेंबर साफ करण्याचे काम करीत असे. काही वेळा तो पत्नी आणि मुलांकडे देखील पैशांची मागणी करत होता.

पत्नी आणि दोन्ही मुले त्याला जुमानत नसल्यामुळे त्याच्या मनात मुलांविषयी राग निर्माण झाला होता. या रागाच्या भरातच त्याने मुलाची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: A 12-year-old boy's throat was cut