१० वी पास युवकाने बनवली कंपनी, डायरेक्टर होऊन केला प्रताप; पोलीस अधिकारी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:33 IST2025-02-10T12:33:28+5:302025-02-10T12:33:51+5:30

विशेष म्हणजे या फसवणूक करणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड १० वी शिकलेला अरिहंत होता

A 10th pass youth from Noida cheated many people, looted 10 crores. Police arrested him | १० वी पास युवकाने बनवली कंपनी, डायरेक्टर होऊन केला प्रताप; पोलीस अधिकारी हैराण

१० वी पास युवकाने बनवली कंपनी, डायरेक्टर होऊन केला प्रताप; पोलीस अधिकारी हैराण

अलीकडच्या काळात तुम्हाला ५ मिनिटांत कर्ज मिळेल या जाहिरातीने आकर्षित केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या जाहिराती आणि त्याखाली दिलेल्या लिंकपासून तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे कारण यामाध्यमातून कोट्यवधी रूपयांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आलेत. नोएडा येथे असेच प्रकरण उघड झाले. ज्यात १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्याने फायनान्स कंपनी उघडून कर्जाच्या नावाखाली अनेकांना गंडवलं. या प्रकरणाचा तपास करताना युवकाने १० कोटीहून अधिक फसवणूक केल्याचं पोलिसांनी पुढे आणले.

नोएडा पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. ज्यात १० वी पास युवक हा मुख्य आरोपी आहे. आरोपीने फायनान्स कंपनी उघडल्यानंतर कर्जाचं आमिष दाखवून विविध राज्यातील अनेकांसोबत कोट्यवधीची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास करताना फायनान्स कंपनीच्या संचालकांमध्ये १० वी पास युवकाचा समावेश समोर आला. हाच या फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलीस अधिकारी शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, आम्हाला आलेल्या एका तक्रारीनुसार, पीडित व्यक्तीसोबत १० लाख रूपयांच्या कर्जाच्या नावाखाली १ लाख ३८ हजार वसूल करण्यात आले होते. आम्ही याचा तपास सुरू केला तेव्हा फसवणूक करणारी फायनान्स कंपनीचे संचालक अरिहंत जैनसह त्याचे २ साथीदार धर्मेंद्र आणि अशोकला अटक करण्यात आली. आरोपींकडून ४ लॅपटॉप, १४ मोबाईल फोन, १८ चेक बुक, ५ मोठ्या रक्कमेचे चेक, ९ विविध बँकांचे बनावट शिक्के इत्यादी जप्त करण्यात आले असं त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या फसवणूक करणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड १० वी शिकलेला अरिहंत होता. अरिहंतने २०२४ साली मनी ऑन नवकार नावाने एक कंपनी बनवली होती. कर्ज देण्याच्या नावाखाली त्याने अनेकांना फसवले. पकडलेल्या आरोपींना अनेकांची १० कोटींहून अधिक फसवणूक केल्याचं समोर आले. कर्ज देण्याचं आमिष दाखवून ते लोकांकडून वेगवेगळे शुल्क आकारत होते. लवकर कर्ज मंजूर होण्यासाठीही पैसे घ्यायचे. त्यानंतर सिबिल स्कोअर कमी असल्याचे सांगत संबंधितांना कर्ज नाकारायचे. त्यानंतर मोबाईल बंद करून ठेवायचे. आतापर्यंत या आरोपींनी १०० हून अधिक लोकांना फसवलं आहे.
 

Web Title: A 10th pass youth from Noida cheated many people, looted 10 crores. Police arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.