९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 08:38 IST2025-10-08T08:38:19+5:302025-10-08T08:38:54+5:30
घटनेच्या एक दिवस आधी पूरन कुमार यांनी रोहतकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतला होता.

९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
चंदीगड - हरियाणा पोलीस दलातील एडीजीपी वाय पूरन कुमार मंगळवारी दुपारी त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. प्राथमिक तपासात पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पूरन कुमार त्यांच्या मेव्हण्याच्या घराजवळ साऊंडप्रूफ बेसमेंटमध्ये असताना ही घटना घडली. त्यांनी त्यांच्या सर्व्हिस बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याचं बोललं जात आहे. पूरन कुमार यांनी मृत्यूपूर्वी ९ पानी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात काही विद्यमान आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. ही सुसाईड नोट फॉरेन्सिक तपासानंतर सार्वजनिक केली जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी पूरन कुमार यांनी रोहतकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतला होता. पूरन कुमार हरियाणा कॅडरमधील २००१ बॅचचे अधिकारी होते. ते त्यांच्या स्पष्टवक्त्या आणि व्यवस्थेतील अनियमितता उघड करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार जपानच्या दौऱ्यावर होत्या. त्यांची धाकटी मुलगी जी घरी होती, दुपारी २ वाजताच्या सुमारास ती बेसमेंट गेली आणि तिचे वडील रक्ताच्या थारोळ्यात सोफ्यावर पडलेले आढळले. तिने ताबडतोब सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
एक रिव्हॉल्व्हर, मृत्युपत्र आणि ९ पानांची अखेरची चिठ्ठी सापडली
आयजी पुष्पेंद्र सिंह, एसएसपी कौर आणि एसपी सिटी प्रियांका घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आणि संपूर्ण तपास प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर, मृत्युपत्र आणि ९ पानांची अंतिम चिठ्ठी जप्त केलं आहे. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास पूरन कुमार यांनी त्यांच्या पीएसओकडून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेतली आणि त्याला काही तरी काम आहे असं सांगितले. त्यानंतर ते घरच्या बेसमेंटमध्ये गेले. तिथे साऊंडप्रुफ असल्याने गोळीचा आवाजही कुणाला ऐकायला आला नाही. घटनेच्या १ तासाने जेव्हा मुलगी तिथे गेली तेव्हा तिथलं दृश्य पाहून तिला धक्का बसला.
कोण होते पूरन कुमार?
मूळचे आंध्र प्रदेशातील आणि अनुसूचित जाती समुदायाचे असलेले पुरन कुमार यांनी बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स) पदवी घेतली होती आणि ते आयआयएम अहमदाबादचे पदवीधर देखील होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी स्वतःच्या विभागाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढल्या. त्यांनी एकदा तत्कालीन हरियाणा डीजीपी मनोज यादव यांच्यावर भेदभावाचा आरोप केला होता आणि या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली होती. अलीकडेच त्यांची रोहतक रेंजच्या आयजी मधून सुनारिया रोहतक येथील प्रशिक्षण केंद्रात बदली झाली. पुरन कुमार आणि त्यांच्या पत्नीला दोन मुली आहेत. मोठी मुलगी परदेशात शिक्षण घेत आहे तर धाकटी मुलगी तिच्या कुटुंबासह चंदीगडमध्ये राहते.