गुजरातमध्ये ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील एकासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 13:04 IST2021-11-11T11:32:59+5:302021-11-11T13:04:54+5:30
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे जप्त केलेल्या अमली पदार्थांत हेरॉइन, मेथामेफटामाइन यांचा समावेश आहे.

गुजरातमध्ये ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील एकासह तिघांना अटक
गांधीनगर : पाकिस्तानहून तस्करी करून आणलेले सुमारे ८८.२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थगुजरात पोलिसांनी जप्त केले असून, या प्रकरणी तीनजणांना अटक केली आहे. त्यांतील एक आरोपी सज्जाद घोसी हा ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून, अन्य दोन आरोपी त्याचे भाऊ आहेत.
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे जप्त केलेल्या अमली पदार्थांत हेरॉइन, मेथामेफटामाइन यांचा समावेश आहे. हे अमली पदार्थ घेऊन जाण्यासाठी सज्जाद गुजरातमध्ये आला होता. तो व त्याच्या दोन भावांकडून अमली पदार्थांची ४७ पाकिटे जप्त करण्यात
आली.
मुंब्र्यातील भाजीविक्रेता
राजकोट विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप सिंह यांनी सांगितले की, सज्जाद घोसी याला १७.६५ किलो इतक्या वजनाच्या अमली पदार्थांसह मंगळवारी (दि. ९) अटक केली. तो मुंब्रा येथे भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. त्यानंतर बुधवारी त्याच्या दोन भावांना अटक करण्यात आली. त्यांची नावे सलीम कारा व अली कारा अशी आहेत. या अमली पदार्थांची पाकिस्तानातून समुद्रमार्गे तस्करी करण्यात आली होती.