ठाणे : भारतीय चलनातील दोन हजारांच्या बनावट चलनी नोटांच्या विक्रीस आलेल्या सचिन आगरे (२९, रा. कळंबट, रत्नागिरी) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. या त्रिकूटाकडून ८५ लाख ४८ हजारांच्या बनावट नोटाही हस्तगत केल्या आहेत.
कापूरबावडी सर्कल येथील टीएमटीच्या बसथांब्याजवळ एक जण दोन हजारांच्या बनावट नोटा चलनामध्ये वटविण्यासाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे, जमादार बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे आणि देवीदास जाधव आदींच्या पथकाने आगरे याला सापळा रचून ९ डिसेंबर रोजी कापूरबावडी सर्कल येथून अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली. त्यानंतर मन्सूर खान (४५, रा. शिराळ, रत्नागिरी) आणि चंद्रकांत माने (४५, रा. साकीनाका, मुंबई) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन हजार रुपये दराच्या ८५ लाख ४८ हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या. याशिवाय त्या छापण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, पेपर रिम्स, शाई, कटर, मोबाइल आदी सामग्रीही जप्त केली. त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
Web Title: 85 lakh counterfeit notes seized in Thane
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.