सारवी, कविता, दिनाज... ८० वर्षांच्या वृद्धाला चौघींनी गोड बोलून अडकवलं, गमावले ९ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:43 IST2025-08-08T16:42:05+5:302025-08-08T16:43:05+5:30

४ महिलांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या ८० वर्षीय वृद्धाने गमावले नऊ कोटी रुपये

80 year old man trapped in the love trap of 4 women lost 9 crores | सारवी, कविता, दिनाज... ८० वर्षांच्या वृद्धाला चौघींनी गोड बोलून अडकवलं, गमावले ९ कोटी रुपये

सारवी, कविता, दिनाज... ८० वर्षांच्या वृद्धाला चौघींनी गोड बोलून अडकवलं, गमावले ९ कोटी रुपये

Mumbai Cyber Crime: सोशल मीडियावरील झालेल्या अज्ञात मैत्रीने मुंबईतील एका ८० वर्षीय वृद्धाचे आयुष्य हादरवून टाकले. मुंबईतल्या एका ८० वर्षीय वृद्धाने ऑनलाइन प्रेमाच्या शोधात स्वतःची आयुष्यभराची बचत गमावली आहे. फेसबुकवर ४ वेगवेगळ्या महिलांसोबतच्या अफेअरमुळे २१ महिन्यांत वृद्धाने तब्बल ९ कोटी रुपये गमावले. सायबर पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. या वृद्धाला फसवणारे लोक वेगळे होते की फक्त एकच व्यक्ती होती याचा तपास पोलीस करत आहेत.

प्रेम, सहानुभूती आणि खोट्या गरजांच्या नावाखाली वृद्ध व्यक्तीची २१ महिन्यांत ७३४ व्यवहारांद्वारे सुमारे ८.७ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या वृद्ध व्यक्तीला ऑनलाइन प्रेम शोधणे इतके महागात पडेल असं कधीच वाटले नसेल. २१ महिन्यांत वृद्धाने एकामागून दुसरी, मग तिसरी आणि नंतर चौथ्या महिलेच्या
जाळ्यात अडकून सुमारे ९ कोटी रुपयांची आपली संपूर्ण आयुष्यभराची बचत गमावली. प्रेमाच्या नावाखाली फसवलो गेलो असल्याचे कळताच त्याने पोलिसांशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून फसवणुकीच्या या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

फसवणूक झालेली वृद्ध व्यक्ती मुंबईत त्याच्या मुला आणि सुनेसोबत राहते. एप्रिल २०२३ मध्ये त्याने फेसबुकवर सारवी नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते आणि सारवीने त्याची रिक्वेस्ट नाकारली. पण काही दिवसांनी सारवीने त्याला रिक्वेस्ट परत पाठवली, जी वृद्धाने स्वीकारली. यानंतर, दोघांनीही ऑनलाइन चॅटिंग सुरू केले आणि नंतर व्हॉट्सअॅप नंबरची देवाणघेवाण केली. सारवीने त्या वृद्ध पुरूषाला सांगितले की ती तिच्या पतीपासून वेगळी आहे आणि तिच्या मुलांसोबत राहते. हळूहळू ती त्याच्याकडे पैसे मागू लागली. तिने सांगितले की तिची मुले आजारी आहेत.

त्यानंतर कविता नावाच्या एका महिलेने त्या वृद्ध पुरूषाला व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवला. तिने त्याला सांगितले की सारवीने तिला तुमचा नंबर दिला आहे आणि मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. कविता वृद्धाला कामुक मेसेज पाठवत असे आणि तिच्या आजारी मुलांच्या उपचारांसाठी पैसेही मागत असे. डिसेंबर २०२३ मध्ये, त्या वृद्ध पुरूषाला एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज येऊ लागले. हा नंबर एका महिलेचा होता जी स्वतःला सारवीची बहीण असल्याचे सांगत होती. तिने स्वतःची ओळख दिनाज अशी करुन दिली आणि सारवीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सारवीने मरण्यापूर्वी तिचे हॉस्पिटलचे बिल तुम्ही भरावे अशी तिची इच्छा असल्याचे वृद्धाला सांगितले. दिनाजने चॅटिंगचे स्क्रीनशॉट दाखवले आणि त्या वृद्धाकडून पैसे घेतले. जेव्हा वृद्धाने तिला पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा तिने नकार दिला आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली.

यानंतर या प्रकरणात आणखी एका महिलेची एन्ट्री झाली. जास्मिन नावाच्या एका महिलेने त्या वृद्धाशी संपर्क साधला आणि स्वतःची ओळख दिनाजची मैत्रीण म्हणून करून दिली. तिने त्याला मदतीची विनंती केली. त्यामुळे वृद्धाने  तिलाही पैसे दिले. जेव्हापैसे संपले तेव्हा त्याने त्याच्या सुनेकडून २ लाख रुपये उधार घेतले. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान वृद्धाने चार महिलांना ७३४ व्यवहारांमध्ये ८.७ कोटी रुपये पाठवले होते. पैशांची मागणी सुरूच राहिल्याने त्याने त्याच्या मुलाकडे ५ लाख रुपये मागितले.

त्यानंतर मुलाला संशय आला आणि त्याने वडिलांकडे विचारपूस केली. त्यानंतर वृद्धाने मुलाला संपूर्ण सत्य सांगितले. मुलाने वृद्धाला तुमची फसवणूक झाल्याचे सांगितले. ते ऐकून वृद्ध व्यक्ती आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. २२ जुलै रोजी याप्रकरणी वृद्धाने सायबर पोलिसांच्या  हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली.
 

Web Title: 80 year old man trapped in the love trap of 4 women lost 9 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.