अमेरिकेतून लग्नासाठी आलेल्या ६९ वर्षीय महिलेचा सांगाडा सापडला; युकेत बसून प्रियकराने दिली होती सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:13 IST2025-09-18T15:14:58+5:302025-09-18T16:13:38+5:30

लग्नासाठी पंजाबमध्ये आलेल्या ६९ वर्षीय भारतीय एनआरआय महिलेचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

69 year old bride came to Ludhiana from the USA to get married her 67 year old fianc in England got her murdered | अमेरिकेतून लग्नासाठी आलेल्या ६९ वर्षीय महिलेचा सांगाडा सापडला; युकेत बसून प्रियकराने दिली होती सुपारी

अमेरिकेतून लग्नासाठी आलेल्या ६९ वर्षीय महिलेचा सांगाडा सापडला; युकेत बसून प्रियकराने दिली होती सुपारी

Ludhiana NRI Murder Case: पंजाबच्या लुधियाना येथे घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. अमेरिकेतील ६९ वर्षीय अनिवासी भारतीय रुपिंदर कौर पंढेर यांची हत्या करण्यात आली. लुधियानाजवळील घुंगराणा गावातील एका नाल्यातून रुपिंदर यांचा सांगाडा सापडला. पोलिसांनी आता या हत्येचा कट उघडकीस आणला. घटनास्थळावरून पोलिसांनी महिलेचा खराब झालेला आयफोनही जप्त केला, जो पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून देण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर येथील न्यायालयीन संकुलात टायपिस्ट म्हणून काम करणारा आरोपी सुखजीत सिंग याने त्याची चरणजीत सिंग ग्रेवालच्या सांगण्यावरून रुपिंदरची हत्या केल्याची कबुली दिली. युकेमध्ये राहणाऱ्या चरणजीतने रुपिंदरशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिला संपवून टाकण्याचा कट रचला होता. यासाठी त्याने त्याच्या ओळखीच्या सुखजीत सिंगला सुपारी दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, सुखजीतने १२ जुलै रोजी त्याच्या घरात बेसबॉल बॅटने रुपिंदरची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह कोळशावर जाळला. त्यानंतर चार पोत्यांमध्ये भरला आणि घुंगराणा येथील नाल्यात फेकून दिला. हत्येनंतर, सुखजीतने ऑगस्टमध्ये पोलिसांकडे बेपत्ता रुपिंदरची तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये सुखजीतने दावा केला होता की रुपिंदर कॅनडामध्ये एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दिल्ली विमानतळावर गेली होता. रुपिंदरची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी त्याने पोलिसांना खोटी माहिती दिली.

पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम तैनात केली आणि रुपिंदरच्या बँक खात्यांद्वारे झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरु केली.  रुपिंदर बेपत्ता झाल्यानंतर लुधियाना पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये संशयितांची नावे दिली गेली. यूकेमध्ये असलेल्या चरणजीत सिंग ग्रेवालचे एफआयआरमध्ये मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. २४ जुलै रोजी रुपिंदराचा मोबाईल फोन बंद असल्याचे पाहून तिची बहीण कमल कौर खैरा हिला संशय आला. २८ जुलैपर्यंत खैरा यांनी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाला याची माहिती दिली होती. त्यांनी स्थानिक पोलिसांवर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दबाव आणला.

कमलजीत म्हणाली, माझ्या बहिणीला लग्नाचे आणि चांगल्या आयुष्याचे आमिष दाखवून तिला इथं आणण्यात आले होते. पण तिची निर्घृण हत्या करण्यात आली. रुपिंदर आणि चरणजीत एका मेट्रोमोनियल वेबसाइटद्वारे भेटले होते. तर २०१४ मध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचारादरम्यान चरणजीत सिंग आणि सुखजीत सिंग यांची भेट झाली. नंतर चरणजीतने सुखजीतला मालमत्तेच्या वादात रुपिंदरला मदत करण्यास सांगितले. रुपिंदर लुधियानाला भेटल्यावर अनेकदा सुखजीतच्या घरी राहायची आणि तिचा पॉवर ऑफ अॅटर्नी सुखजीतला दिली होती. आरोपींनी रुपिंदर कौरची लाखो रुपयांची फसवणूक करण्यासाठी हा कट रचला होता. रुपिंदर कौरने आरोपी सोनू आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर केली होती.

तसेच रुपिंदरने सुखजीत आणि चरणजीत यांना ३०-३५ लाख रुपये ट्रान्सफर केले होते. चरणजीतने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यावर त्याने रुपिंदरला मारण्यासाठी सुखजीतला ५० लाख रुपये देण्यास कबुल केले. त्यानंतर सुखजीतने रुपिंदरची हत्या केली.

Web Title: 69 year old bride came to Ludhiana from the USA to get married her 67 year old fianc in England got her murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.