बचत गटात पैसे भरायला लावून ६० महिलांची फसवणूक, पती-पत्नीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:45 IST2025-02-15T15:44:47+5:302025-02-15T15:45:02+5:30
बचत गटाचे पैसे जमा करून घेताना पती-पत्नीने पैसे दिल्यानंतर कोणतीही पावती अथवा पासबुक दिले नाही. पावतीबाबत विचारले असता त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.

बचत गटात पैसे भरायला लावून ६० महिलांची फसवणूक, पती-पत्नीवर गुन्हा
सांगोला : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून पती-पत्नीने मिळून बचतगटाच्या नावाखाली महिलेकडून प्रती महिना ३०० रुपये बचत घेऊन त्यापोटी पाच वर्षांनी मुद्दल व्याजाचा परतावा न देता महिलेची सुमारे ७२ हजार रुपयांची तसेच त्यांच्या प्रमाणे गावातील सुमारे ६० महिलांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी, जयश्री बिरा लवटे (रा. महूद) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शाहीर करीम मुलाणी व यास्मिन शाहीर मुलानी दोघेही (रा. महूद, ता. सांगोला) पती-पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी, जयश्री लवटे यांच्या फिर्यादीनुसार शाहीर मुलाणी व पत्नी यास्मिन मुलाणी (रा. महुद, ता. सांगोला) दोघे पती-पत्नी बचत गट चालवतात. त्यांनी फिर्यादीस तुम्ही महिना ३०० रुपये बचत भरल्यास तुम्हाला पाच वर्षानंतर ३४ हजार रुपये मिळतील असे सांगून पाच वर्षे बचत भरून घेतली व त्यानंतर फिर्यादीचे नातेवाइकांनी भारतीय महिला स्वयं सहा. बचतगट महुद, महाराष्ट्र झिंदाबाद स्वयं सहा. महिला बचतगट, महुद बु. तसेच इतर ३ बचत गट असे एकूण ५ गटामध्ये प्रती महिन्याला ३०० रुपये प्रमाणे प्रती महिना १५०० रुपये असे दि. १ फेब्रुवारी २०१९ ते ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७२ हजार रुपये भरले.
बचत गटाचे पैसे जमा करून घेताना पती-पत्नीने पैसे दिल्यानंतर कोणतीही पावती अथवा पासबुक दिले नाही. पावतीबाबत विचारले असता त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे जमा करतेवेळी महिलांचे रजिस्टरवर सह्याही घेतलेल्या आहेत. दरम्यान, २०२० साली फिर्यादीच्या मुलाचे लग्नासाठी पैशाची गरज असल्याने आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी बचतगटातून पैसे मिळत नसल्याचे सांगितले. इतर सुमारे ६० महिलांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.