६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 05:53 IST2025-12-20T05:53:00+5:302025-12-20T05:53:33+5:30
दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजंटकडून ईडीने जप्त केला ऐवज

६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
भारतीयांना बेकायदेशीररीत्या अमेरिकेत पाठविण्याच्या घटनांशी संबंधित मनी लॉड्रिगप्रकरणी ईडीने गुरुवारी घातलेल्या छाप्यांमध्ये ४.६२ कोटी रुपये, ३१३ किलो चांदी, ६ किलो सोन्याची बिस्किटे जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दिल्ली, पंजाब (जालंधर) आणि हरियाणा (पानिपत) येथील १२हून अधिक ठिकाणी हे छापे घालण्यात आले.
दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटकडून १९.१३ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. तपासात जप्त केलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून आक्षेपार्ह चॅटही मिळाले आहेत. पंजाब आणि हरियाणा पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरु आहे.
१५०० भारतीयांना अमेरिकेने परत पाठवले
१. ईडीने सांगितले की अमेरिकेत स्थलांतर करण्याची इच्छा असलेल्या अनेकांना एजंटांनी फसविले होते. प्रवाशांना दक्षिण अमेरिकेतील देशांमार्गे धोकादायक मागनि पाठविले. मेक्सिकोच्या सीमेमार्गे अमेरिकेत प्रवेश मिळवून दिला.
२. भारतीयांचा छळ केला, त्यांच्याकडून पैसे उकळून बेकायदा कृत्ये करण्यास भाग पाडले. एजंटांनी पैसे मिळविले. यंदाच्या वर्षात आतापर्यंत अमेरिकेने १५००हून अधिक भारतीयांचे स्थलांतर केल्याचा आरोप करून परत पाठवले.
कागदपत्रे ठेवली तारण
ईडीने जुलैमध्ये छापे घातले होते. त्या रॅकेटमधील एजंटांची ओळख पटवून त्यांची ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.