बनावटी सोने तारण ठेवून बँकेची ५४ लाखांची फसवणूक
By परिमल डोहणे | Updated: May 21, 2023 22:20 IST2023-05-21T22:19:40+5:302023-05-21T22:20:01+5:30
नागपूर चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकाजवळ इसाफ स्मॉल फायनान्स बँक आहे.

बनावटी सोने तारण ठेवून बँकेची ५४ लाखांची फसवणूक
चंद्रपूर : शहरातील रत्नमाला चौकनजीक असलेल्या इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये दहा वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून ५४ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज उचलून बॅंकेची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून वरोरा पोलिस ठाण्यामध्ये भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दुधगवळी या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकाजवळ इसाफ स्मॉल फायनान्स बँक आहे. या बँकेमध्ये ९ मार्च ते ८ मे २०२३ दरम्यान दहा वेगवेगळ्या सोने तारण कर्ज योजनेत भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दुधगवळी यांनी सोन्याचे दागिने ठेवून ५४ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज उचलले. नंतर अधिकाऱ्यांनी बँकेचे ऑडिट केले असता या सर्व सोन्याच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा चढविल्याचे दिसून आले. त्यामुळे ते सोने बनावटी असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत बँक व्यवस्थापकाने वरोरा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरुद्ध कलम ४१७, ४२०, ४६७, ४६८, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला. बॅंकेत बनावट सोन्याचे दागिने ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केल्याची ही पहिलीच घटना वरोरा परिसरात घडल्याचे मानले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोंडशे करीत आहेत.