रेल्वे स्टेशनवरून ५ वर्षीय मुलाचं अपहरण; लैंगिक शोषणानंतर केली हत्या, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:40 IST2024-12-17T10:39:46+5:302024-12-17T10:40:27+5:30
आईने रेल्वे पोलिसांना मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी तपासाला सुरुवात करत सीसीटीव्ही फुटेज तपासले

रेल्वे स्टेशनवरून ५ वर्षीय मुलाचं अपहरण; लैंगिक शोषणानंतर केली हत्या, आरोपीला अटक
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी ५ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या मुलाचा मृतदेह रेल्वे यार्डात फेकून आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
लखनौच्या चारबाग रेल्वे स्टेशनवरील हा प्रकार आहे. जिथे रेल्वे यार्डात एका ५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला. हा मुलगा त्याच्या आईसह राजस्थानहून लखनौला आला होता. जेव्हा तो तिथे पोहचला तेव्हा मुलाचे अपहरण झाले. त्यानंतर आरोपीने अनैसर्गिकरित्या त्याचं लैंगिक शोषण केल्यानंतर निर्दयी हत्या केली. हत्येनंतर मुलाचा मृतदेह रेल्वे यार्डात फेकून आरोपी फरार झाला होता. आई आणि मुलगा राजस्थानहून लखनौ आणि त्यानंतर प्रतापगडला जाणार होते. चारबाग रेल्वे स्टेशनच्या वेटिंग हॉलमध्ये आई आणि मुलगा बसले होते.
यावेळी इब्राहिम नावाच्या व्यक्तीने मुलाशी खेळण्याच्या बहाण्याने बोलणे सुरू केले. त्यानंतर त्याला खायला आणून दिले. जेव्हा मुलाची आई झोपली तेव्हा तो मुलाला घेऊन फरार झाला. या आरोपी इब्राहिमने मुलाचा लैंगिक अत्याचार केला. आई जेव्हा झोपेतून उठली तेव्हा मुलगा दिसत नसल्याने तिचा जीव कासावीस झाला. आईने रेल्वे पोलिसांना मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी तपासाला सुरुवात करत सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीला अटक केली.
दरम्यान, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवला तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या सांगण्यांनुसार पोलीस रेल्वे यार्डात गेले तेव्हा तिथे मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलासोबत लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह रेल्वे यार्डात फेकल्याचं आरोपीने म्हटलं. रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्हीत हा आरोपी मुलाला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.