५ लाख अन् बुलेट घेऊन ये: २ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:36 IST2023-01-16T16:31:53+5:302023-01-16T16:36:14+5:30
भोजपूरच्या सियाहिड हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शाहनवाजनं खुशबूला मागील महिन्यात तिच्या रांची येथील माहेरी पाठवले

५ लाख अन् बुलेट घेऊन ये: २ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू
आरा - बिहारच्या आरा इथं हुंड्यासाठी एका विवाहितेला मारहाण करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पतीसह सासरच्यांवर आरोप करत हत्येनंतर मृतदेह फासावर लटकवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या २ लोकांना अटक केली आहे. तर घटनेनंतर पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
तरी मुहल्ला परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या मोहम्मद शाहनवाज आलम याचे २ महिन्यापूर्वी खुशबू परवीन हिच्यासोबत मोठ्या गाजावाजा करत लग्न झाले. खुशबू ही झारखंडमधील डूरंडा येथे राहणाऱ्या मुन्नवर अली यांची मुलगी आहे. मृत कुटुंबीयांच्या मते, लग्नाच्यावेळी हुंडा म्हणून सासरच्यांची सगळी इच्छा पूर्ण केली. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी खुशबूच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला मारहाण करण्यास सुरूवात केली.
भोजपूरच्या सियाहिड हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शाहनवाजनं खुशबूला मागील महिन्यात तिच्या रांची येथील माहेरी पाठवले. पती शाहनवाजनं ५ लाख रुपयांसह बुलेट गाडी आण, मगच सासरी ये असा निरोप पत्नीला देत माघारी परतला. माहेरच्यांनी तडजोड करत खुशबूला जानेवारी महिन्यात सासरी पाठवले. सासरी पोहचताच खुशबूला पती आणि सासरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप खुशबूच्या घरच्यांनी लावला.
रविवारी संध्याकाळी खुशबूचा मृत्यू झाल्याची बातमी माहेरच्यांना मिळाली. रात्री उशिरा ते रांचीहून आराला पोहचले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी नातेवाईकांच्या आरोपानंतर पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला. या घटनेत पती फरार असून सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. खुशबूचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला हॉस्पिटलला पाठवला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच पतीला ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी वर्तवला.