नवाब मलिक यांच्या मुलाच्या मित्राची ४५ कोटींची मालमत्ता जप्त; वांद्र्यातील तीन फ्लॅटचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 10:27 AM2024-01-09T10:27:42+5:302024-01-09T10:28:22+5:30

‘ईडी’कडून मुंबईत १२ ठिकाणी तर पुणे-गांधीधाम येथेही छापेमारी

45 crore property of Nawab Malik's son's friend seized Including three flats in Bandra | नवाब मलिक यांच्या मुलाच्या मित्राची ४५ कोटींची मालमत्ता जप्त; वांद्र्यातील तीन फ्लॅटचा समावेश

नवाब मलिक यांच्या मुलाच्या मित्राची ४५ कोटींची मालमत्ता जप्त; वांद्र्यातील तीन फ्लॅटचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलाचा खास मित्र असलेल्या मनोहरलाल अगिचा याच्या कंपनीला ‘ईडी’ने दणका देत कंपनीची ४५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त मालमत्तेत वांद्रे येथील ३ फ्लॅट (किंमत ७ कोटी ८० लाख) व गुजरातमधील ३७ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या भूखंडाचा समावेश आहे. याप्रकरणी सोमवारी मुंबईत ‘ईडी’ने १२ ठिकाणी तर पुणे व गांधीधाम येथे छापेमारी केली.

अगिचा हा मे. असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीमध्ये संचालक असून, त्याच्या कंपनीने युनियन बँकेला किमान १४९ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, सीबीआयने प्रथम गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याच्यात मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मे. असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीमध्ये मनोहरलाल अगिचा, रामचंद इसरानी, मोहम्मद दरवेश हे तीन संचालक आहेत. या कंपनीने युनियन बँकेकडून जे कर्ज घेतले होते त्या कर्जाची रक्कम बनावट लेटर ऑफ क्रेडिट तयार करत हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अगिचाचे मलिक कनेक्शन काय?

  • मनोहरलाल अगिचा हा टचवूड रिअल इस्टेट कंपनीमध्ये देखील संचालक आहे. त्याच कंपनीशी नवाब मलिक यांचा मुलगा फराज याचे देखील संबंध असल्याचे बोलले जाते व त्याची व अगिचा याची ‘खास’ मैत्री असल्याची चर्चा आहे.
  • कर्ज प्राप्त रकमेतील मोठा भाग अनेक संबंधित कंपन्यांना कर्ज रूपाने देत ते पैसे बळकावल्याचा आरोप आहे. या खेरीज, पाकिस्तानस्थित एका कंपनीला नैसर्गिक वायूची निर्यात केल्यानंतर त्याचे पैसे देखील कंपनीने वसूल केले नाहीत व हे पैसे तेथून परस्पर हवालामार्गे दुबई, सिंगापूर येथे पाठवत हडपल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
  • दरम्यान, याप्रकरणी रामचंद इसरानी व मनोहरलाल अगिचा याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

Web Title: 45 crore property of Nawab Malik's son's friend seized Including three flats in Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.