चोरीस गेलेले ४२ तोळे दागिने मध्य प्रदेशातून केले हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:24 IST2020-12-25T01:23:33+5:302020-12-25T01:24:02+5:30
Crime News : दोन साथीदार तसेच एका दहावर्षीय मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले.

चोरीस गेलेले ४२ तोळे दागिने मध्य प्रदेशातून केले हस्तगत
ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून चोरीस गेलेले १९ लाख तीन हजारांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने थेट मध्य प्रदेशातील एका गावातील चोरट्यांच्या घरातून कासारवडवली पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
घोडबंदर रोडवरील ओवळा येथील ‘जलसा लॉन’ येथे अनिता सिंग यांच्या मुलाचा ३० नोव्हेंबर २०२० रोजी विवाहसोहळा सुरू होता. त्यावेळी नवरानवरीबरोबर रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोटो काढत असताना अनिता यांनी खुर्चीवर ठेवलेली दागिन्यांची बॅग काही क्षणांत चोरीस गेली. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह दोन मोबाइल आणि ९० हजारांची रोकड होती. याप्रकरणी १ डिसेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, निरीक्षक जयराज रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील गुलखेडी गावातून अट्टल चोरटा बबलू सिसोदिया याचे घर शोधले. बबलूने त्याच्या अन्य दोन साथीदार तसेच एका दहावर्षीय मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले. बबलूचे नाव यामध्ये समोर आल्यावर त्याच्या मध्य प्रदेशातील घरात २० डिसेंबर रोजी झडती घेऊन पालवे यांच्या पथकाने चोरीस गेलेल्या एक लाख ५७ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह ४२३ ग्रॅम वजनाचे १९ लाख तीन हजार ५०० रुपयांचे जवळपास सर्वच दागिने हस्तगत केले. चोरीतील दोन मोबाइल आणि ९० हजारांची रोकड मात्र या झडतीमध्ये मिळाली नाही. पोलिसांची चाहूल लागल्यानंतर बबलूसह त्याचे साथीदार मात्र तिथून पसार झाले. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास डॉ. राठोड यांनी व्यक्त केला.