गोंदिया: मध्यप्रदेशच्या रायसेन येथील एका ३४ वर्षाच्या शिक्षीकेवर गोंदियात सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाचा सश्रम कारवास सुनावला आहे. आरोपी अभिमन्यू प्राणहंस मडामे (२३), डायमंड उर्फ विश्वनाथ डोंगरे (३९) दोन्ही रा. कटंगीटोला, राजेश उर्फ मोगली रमेश बन्सोड (१९) रा. इंदिरानगर कॉलेजटोली कुडवा, नरू उर्फ परमेश्वर रामलाल बिसेन (२४) रा. तेढवा यांचा समावेश आहे. ही सुनावणी २१ सप्टेंबर रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर अहेमद औटी यांनी केली आहे.
मध्यप्रदेशच्या रायसेन येथील ३४ वर्षाची शिक्षिका २३ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या जनरल डब्यात बसून भोपाळ वरून रायपूर येथे जात असतांना त्यांची पैसे असलेली बॅग आरोपींनी पळविली. गोंदिया रेल्वेस्थानकावर गाडी येताच बॅगमधील २१ हजार ९०० रूपये चोरून नेणाऱ्या आरोपींनी ती बॅग डोंगरगड रेल्वेस्थानकावर उतरविली. पिडीत महिला डोंगरगड येथे गेल्यावर फलाटावर त्यांची बॅग ठेवलेली दिसल्याने त्यांनी आपली बॅग ओळखून त्या बॅग जवळ गेल्या असतांना आरोपींनी त्यांना आपले चोरी गेलेले पैसे आपल्याला मिळवून देतो परंतु त्यासाठी गोंदियाला जावे लागेल असे सांगितले. ते पैसे मिळिवण्यासाठी ती शिक्षीका आरोपींसोबत त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गोंदिया रेल्वे स्थानकावर आले.
तिला ऑटो क्रमांक ४८९ मध्ये बसवून अंगुर बगीचा मैदानावर नेले. तेथे तिचे तोंड दाबत असतांना तिने त्यांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी धाऊन तिला पकडले. तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर चौघांनी आळीपाळीने बलात्कार केला. पुन्हा रात्रीला तिच्यावर बलात्कार करून तिला अंगुरबगीचा येथे असलेल्या एका घरी ठेवले. दुसऱ्या दिवशी नजर चुकवून ती महिला पळत गोंदिया रेल्वे स्थानकावर आली. या घटनेची तक्रार आधी गोंदिया रेल्वे पोलिसात करण्यात आली. हा गुन्हा रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३६६, ३७६ (जी) ३७९, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणात सर्व आरोपींना प्रत्येकी २ वर्षाचा सश्रम कारावास व ६० हजार रूपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी केला होता. सरकारी वकील म्हणून ॲड. पी.एस. आगाशे, ॲड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस शिपाई नमिता लांजेवार यांनी काम पाहिले.