३४ हजार ६१५ कोटींच्या बँक घोटाळ्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत? सीबीआयला संशय, मुंबई, महाबळेश्वरमधे छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 12:50 PM2022-07-09T12:50:47+5:302022-07-09T12:51:40+5:30

Bank Scam: देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणता येईल, अशा तब्बल ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा आता सीबीआयला संशय आहे.

34 thousand 615 crore bank scam threads to the underworld? Suspicion to CBI, raid in Mumbai, Mahabaleshwar | ३४ हजार ६१५ कोटींच्या बँक घोटाळ्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत? सीबीआयला संशय, मुंबई, महाबळेश्वरमधे छापेमारी

३४ हजार ६१५ कोटींच्या बँक घोटाळ्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत? सीबीआयला संशय, मुंबई, महाबळेश्वरमधे छापेमारी

Next

मुंबई : देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणता येईल, अशा तब्बल ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद टोळीपर्यंत पोहोचल्याचा आता सीबीआयला संशय आहे. सीबीआयने शुक्रवारी मुंबईत अजय नावंदर या व्यक्तीच्या घरावर छापेमारी केली. अजय नावंदर हा छोटा शकीलचा अत्यंत जवळचा साथीदार असल्याचे समजते. या घोटाळ्यातील काही पैसा हा नावंदरच्या माध्यमातूनही फिरवण्यात आल्याचा सीबीआयला संशय असून त्यादृष्टीने आता तपास सुरू झालेला आहे. 

डीएचएफएल कंपनीचे संचालक यांचे अंडरवर्ल्डशी कथित संबंध असल्याची ही दुसरी घटना असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी अन्य एका प्रकरणात डीएचएफएलच्या वाधवान बंधूंनी दाऊद गँगचा सदस्य असलेल्या इक्बाल मिर्ची याच्यासोबत काही आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल असून ईडीचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने मुंबई आणि महाबळेश्वर येथील देवाण बंगला अशा दोन ठिकाणी छापेमारी केली. यामधे अजय नावंदर आणि रिबेका देवाण या दोघांच्या घरावर ही छापेमारी केली. विशेष म्हणजे या छापेमारीदरम्यान तब्बल ५५ कोटी रुपयांची अत्यंत नामांकित चित्रकारांची चित्रे तसेच काही मूर्ती सापडल्या. सीबीआयने हे सारे ताब्यात घेतले आहे. बँक घोटाळ्यानंतर मिळालेला पैसा वाधवान आणि अन्य लोकांनी अनेक ठिकाणी फिरवला होता. अनेक ठिकाणी त्याद्वारे  गुंतवणूकही केली होती. याच घोटाळ्यातील पैशाचा वापर हा या मौल्यवान चित्रांच्या आणि मूर्तींच्या खरेदीसाठी झाल्याचा दावा सीबीआयने केला आहे. या घोटाळाप्रकरणी २२ जून रोजी  सीबीआयने मुंबईतील काही प्रमुख बिल्डरांच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान, कंपनीचे अन्य संचालक तसेच व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्याशी संबंधित १२ कार्यालयांवर छापेमारी केली होती. उपलब्ध माहितीनुसार हे कर्ज प्रकरण सन २०१० मधील आहेत. २४ जुलै २०१० रोजी एकूण २९ बँकांच्या समूहाने या कर्जाचे वितरण केले होते. मात्र, यातून १२ बँका बाहेर पडल्या.

या प्रकरणात दिले गेलेले कर्ज फेडले जात नसून कर्जापोटी दिलेल्या रकमेचा अपहार झाल्याची गोष्ट सन २०१९ मध्ये उजेडात आल्यानंतर या बँकांनी केपीएमजी कंपनीला लेखापरीक्षणासाठी नेमले. या परीक्षणात या कर्ज रकमेचा अपहार झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. या प्रकरणी, डीएचएफलचे वाधवान, व्यावसायिक सुधाकर शेट्टी, स्कायलार्क बिल्डकॉन प्रा. लि. दर्शन डेव्हलपर्स प्रा. लि., स्गीता कन्स्ट्रक्शन बिल्डर्स प्रा. लि., टाऊनशिप डेव्हलपर्स प्रा.लि., शिशिर रिॲलिटी प्रा.लि., सबलिंक रिअल इस्टेट आदी लोकांचे तसेच कंपन्यांचे तसेच काही सरकारी अधिकाऱ्यांचेही नाव या  प्रकरणात दाखल एफआयआरमधे नमूद आहे.

Web Title: 34 thousand 615 crore bank scam threads to the underworld? Suspicion to CBI, raid in Mumbai, Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.