थर्टी फर्स्ट पडले महागात; १० घरफोड्या करत चोरट्यांनी लांबवले दागिने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 21:09 IST2020-01-01T21:07:21+5:302020-01-01T21:09:35+5:30
रहिवाशांमध्ये दहशत, गुन्हा दाखल

थर्टी फर्स्ट पडले महागात; १० घरफोड्या करत चोरट्यांनी लांबवले दागिने
मुंबई - नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांचा फायदा घेत लुटारूंनी घाटकोपरमध्ये मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान दहा घरांचे टाळे तोडून घरफोडीचा प्रयत्न केला. यापैकी चार घरांमधून किंमती ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
शाळेला सुट्टी असल्याने काही लोक सुट्टीसाठी गावी आणि बाहेर फिरायला गेले होते. तर, काहीजण नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी बाहेर पडले. याच दरम्यान घाटकोपरमध्ये साईनाथ रोड येथील कदमचाळीत मध्यरात्री २ ते ४च्या दरम्यान लुटारूंनी १२ घरांमध्ये घरफोडीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी काहींच्या घरांतून दागिने, पैसे तर काहींच्या घरांतून साड्या चोरीला गेल्या आहेत.
यापैकी शांताराम खांडभोर यांच्या घरातून ४५ हजार रुपये चोरीला गेले आहेत. २ जानेवारी रोजी त्यांना दोन वाहनांचा हप्ता भरायचा असल्याने त्यांनी पैसे घरात आणून ठेवले होते. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात घरांमध्ये घरफोडीचा प्रयत्न झाला असून, चार घरांमध्ये चोरी झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.