‘मनीएज’द्वारे ३०० कोटींची फसवणूक? मुख्य सूत्रधार राजीव जाधवचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 03:14 IST2025-01-17T03:13:55+5:302025-01-17T03:14:10+5:30

जाधवने हरिप्रसादला हाताशी घेत मनीएज ग्रुपची स्थापना करत विविध ठिकाणी शाखा उघडणे सुरू केले. 

300 crore fraud through 'MoneyAge'? Search underway for main mastermind Rajiv Jadhav | ‘मनीएज’द्वारे ३०० कोटींची फसवणूक? मुख्य सूत्रधार राजीव जाधवचा शोध सुरू

‘मनीएज’द्वारे ३०० कोटींची फसवणूक? मुख्य सूत्रधार राजीव जाधवचा शोध सुरू

मुंबई : मनीएज घोटाळ्याची पाळेमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात पसरली असून, फसवणुकीचा आकडा ३०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेने वर्तविली आहे. यामागील मुख्य सूत्रधार राजीव जाधवचा शोध सुरू आहे. जाधवने गुंतवणुकीच्या रकमेतून मालमत्ता उभारण्यासह रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

एमबीए झालेला राजीव जाधव पूर्वी शेअर मार्केटमध्ये इंडिया इन्फोलीन नावाने गुंतवणुकीचे काम करायचा. पुढे एका बँकेच्या म्युचुअल फंडमध्ये नोकरीला लागला. तेथे आरोपी हरिप्रसाद वेणुगोपाल नोकरीला होता.  पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूकदारांसाठी ये-जा सुरू असताना पोस्टात काम करणारी प्रिया प्रभू (५३) त्यांच्या संपर्कात आली. जाधवने हरिप्रसादला हाताशी घेत मनीएज ग्रुपची स्थापना करत विविध ठिकाणी शाखा उघडणे सुरू केले. 

रिअल इस्टेटसह पतसंस्थेत उलाढाल...
मेकॅनिकल इंजिनिअर असलेला रावराणे याच्या ‘आरंभ’ नावावे सुरू असलेल्या रिअल इस्टेट व्यवसायात जाधवने गुंतवणूक केली. तसेच विविध मालमत्ताही खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी रावराणेलाही अटक केली असून, त्याच्या व्यवसायात आतापर्यंत किती पैसे गुंतवले? याचा लेखाजोखा तपासला जात आहे.  

दोघांविरुद्ध लूक आउट नोटीस जारी 
राजीव आणि प्रिया देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तपास पथकाने आरोपींच्या घरांसह त्यांच्या मुलुंडच्या कार्यालयात छापेमारी करत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केले आहे. आतापर्यंत आरोपींसह त्यांच्या कंपनीचे १६ बँक खाती गोठविण्यात आली असल्याचे तपास पथकाने सांगितले. मुलुंडचे कार्यालय सहा महिन्यांपासून बंद होते. कार्यालयातून मालमत्तेसंबंधित कागदपत्रे हाती लागले असून, त्याचा तपास सुरू आहे.

नवीन गुंतवणूकदार जोडणाऱ्याला कमिशन
मुंबई, नागपूर, नाशिकसह राज्यभरात जाधवने १२ शाखा सुरू केल्या.  २०१३ पासून त्याने गुंतवणुकीवर वर्षाला २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखले. सुरुवातीला दरमहिना गुंतवणुकीवर २ टक्केप्रमाणे पैसे देत होता. तसेच नवीन गुंतवणूकदार जोडणाऱ्यालाही कमिशन मिळत असल्याने ही साखळी वाढत गेली. त्यामुळे फसवणुकीचा आकडा ३०० कोटींवर जाण्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तविली. तसेच हरिप्रसाद हा सेल विभाग सांभाळत असून, आर्थिक व्यवहार जाधव हाताळत होता.

Web Title: 300 crore fraud through 'MoneyAge'? Search underway for main mastermind Rajiv Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.