३ शहरं, ३ लव्ह मॅरेज अन् ३ खुनी बायका; कट रचून नवऱ्याचा काटा काढणाऱ्या खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:17 IST2025-03-26T13:12:27+5:302025-03-26T13:17:56+5:30
औरैया इथल्या प्रगतीने तिच्या प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या १५ दिवसांतच पती दिलीपची हत्या केली.

३ शहरं, ३ लव्ह मॅरेज अन् ३ खुनी बायका; कट रचून नवऱ्याचा काटा काढणाऱ्या खळबळजनक घटना
नवी दिल्ली - देशात सध्या सौरभ हत्याकांडासोबतच औरैया आणि बंगळुरू मर्डरचीही चर्चा होत आहे. या तिन्ही प्रकरणात हत्येचा पॅटर्न एकसारखाच आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ इथं सौरभची पत्नी मुस्कान हिने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केली. यूपीच्या औरैया इथेही पत्नी प्रगतीने लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच पती दिलीपच्या हत्येचा कट रचला. बंगळुरू येथेही पत्नीने पतीची हत्या केल्याचं समोर आले. विशेष म्हणजे हे तिन्ही विवाह लव्ह मॅरेज होते.
सौरभ हत्याकांडाची कहाणी
मेरठ येथे सौरभची साहिल आणि मुस्कान यांनी प्लॅनिंग करून हत्या केली. सौरभचं मुस्कानवर प्रेम होते. मुस्कान त्याच्या आयुष्यातून दूर जाऊ नये यासाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्याने मुस्कानशी लग्न केले. लग्नानंतर दोघांना एक मुलगीही झाली. परंतु काही वर्षातच सौरभ कमावण्यासाठी लंडनला गेला. त्यातच सौरभची पत्नी मुस्कान तिच्या शाळेचा फ्रेंड साहिलसोबत भेट झाली. या दोघांच्या भेटी वाढल्या आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. सौरभ लंडनला काम करायचा तेव्हा इथं साहिल मुस्कान एकत्र मज्जा करायचे. मुस्कान साहिलच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिने सौरभचा काटा काढायचं ठरवलं. साहिलसोबत मिळून मुस्कानने सौरभची हत्या केली त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून एका ड्रममध्ये सिमेंट टाकून गाडून ठेवले होते. सौरभ हत्येचा कट उघडकीस येताच पोलिसांनी मुस्कान आणि साहिल या दोघांना अटक केली.
औरैयाच्या प्रगतीची कहाणी
औरैया इथल्या प्रगतीने तिच्या प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या १५ दिवसांतच पती दिलीपची हत्या केली. प्रगतीची मोठी बहीण पारुलचं लग्न २०१९ साली दिलीपचा मोठा भाऊ संजयशी झालं होते. प्रगती आणि दिलीप एकमेकांना चांगले ओळखत होते. परंतु प्रगती अनुराग यादव नावाच्या युवकावर प्रेम करत होती. जो तिच्याच गावातील होता. जेव्हा या दोघांच्या नात्याची भनक लागली तेव्हा घाईगडबडीने घरच्यांनी प्रगतीचं लग्न दिलीपसोबत ठरवलं. ५ मार्च २०२५ रोजी प्रगती आणि दिलीप यांनी लग्न केले. मात्र प्रगतीच्या डोक्यात भलतेच काही शिजत होते. लग्नानंतरही तिने अनुरागचं प्रेम तसेच जिवंत ठेवले. त्यातूनच प्रगतीने अनुरागसोबत मिळून दिलीपच्या हत्येचा कट रचला. प्रगतीने अनुरागला १ लाख रूपये दिले, ते अनुरागने मारेकऱ्यांना सुपारी देत दिलीपची हत्या केली. या हत्येतील आरोपींना पोलिसांना पकडले आहे.
बंगळुरूच्या लोकनाथ सिंह हत्याकांडात असेच घडले
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ३७ वर्षीय रिअल इस्टेट एजेंटची त्याच्या पत्नीने हत्या केली. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लोकनाथ सिंह यांचा मृतदेह सापडला. २२ मार्चला त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप पत्नी यशस्विनी आणि तिची आई हेमावर लावण्यात आला. यशस्विनीने काही महिन्यांपूर्वीच आई वडिलांच्या मर्जीविरोधात जात लोकनाथशी लग्न केले. लग्नानंतर यशस्विनी जेव्हा सासरी पोहचली तेव्हा त्याच्या पतीचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचं तिला कळलं. यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा भांडण होत होते. पतीसोबत वाद घालून यशस्विनी पुन्हा तिच्या आई वडिलांकडे आली. पती तिच्यावर घरी येण्यासाठी दबाव टाकत होता. तो यशस्विनीच्या आई वडिलांशीही रोज भांडण करत होता. त्यातून यशस्विनी त्रस्त होती. त्यातून लोकनाथच्या हत्येचा कट रचण्यात आला.
२२ मार्च रोजी यशस्विनीने लोकनाथला संपर्क केला. त्याला बंगळुरू येथे भेटण्यास बोलावले. भेटीत तिने लोकनाथला भरपूर दारू पाजली. त्यानंतर नशेच्या अवस्थेत पतीला झोपेची औषधे जेवणातून खायला दिली. जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा यशस्विनीच्या आईने लोकनाथच्या गळ्यावर चाकूने वार केले. या दोघींनी मिळून त्याला संपवला. त्यानंतर एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत त्याचा मृतदेह फेकून दिला. हा प्रकार तपासात समोर येताच पोलिसांनी यशस्विनी आणि तिच्या आईला अटक केली.