सायबर पोलीस ठाण्यात २८ पदे रिक्त; आरटीआयमार्फत माहिती झाली उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 21:43 IST2019-11-25T21:38:03+5:302019-11-25T21:43:10+5:30
उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल यांची वाणवा

सायबर पोलीस ठाण्यात २८ पदे रिक्त; आरटीआयमार्फत माहिती झाली उघड
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरात सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत असताना त्याच्या प्रतिबंधासाठी असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात मंजूर पदापेक्षा तब्बल २८ पदे रिक्त आहेत. पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलची अनुक्रमे १० व १८ पदे भरण्यात आलेली नाहीत, त्याऐवजी विविध दर्जाची एकूण १९ पदे अशी कबुली दस्तरखुद पोलीस प्रशासनाने दिलेली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकार, अंमलदारांबाबतची माहिती विचारली होती. त्याबाबत जनमाहिती अधिकारी व सहाय्यक आयुक्त सुर्यकांत तरडे यांनी सांगितले की, सायबर पोलीस ठाण्यात एकुण ६० पदे मंजूर आहेत. त्यामध्ये उपनिरीक्षकासाठी १७ पदे मंजूर असताना केवळ १० अधिकारी कार्यरत आहेत. तर कॉन्स्टेबलची एकुण २६ कॉन्स्टेबलपैकी केवळ ८ जण कार्यरत आहेत. त्याशिवाय ९ सहाय्यक निरीक्षक आणि हवालदार व नाईक पदाची अनुक्रमे ३ व ७ जण या कक्षामध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या पदांना मंजुरी नसतानाही त्यानां या ठिकाणी कायम ठेवण्यात आले आहे.