उल्हासनगर : दोन ठगांनी सिमेंटच्या नावाखाली ऑनलाईन गुगलद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात २८ लाख ८० हजार पाठविण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रंजित रूपचंदानी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरमध्ये राहणारे रंजित रुपचंदानी यांनी कंपनीसाठी अंबुजा सिमेंटची ऑर्डर देण्यास वर्किंग पार्टनर शंकर भटीजा यांना सांगितले. भटीजा यांनी २ ते १२ एप्रिल दरम्यान गुगल व्हाईसवर ऑनलाईन सौरभ सिंग यांच्या नंबर मिळवून अंबुजा सिमेंटची मागणी केली. सिंग यांनी शंकर भटिजा यांना विश्वासात घेऊन चंद्रपूर गोडाऊन मधून सिमेंट देणार असल्याचे सांगून सिमेंट गोडाऊनचे फोटो पाठविले. तसेच गुगलद्वारे ऑनलाईन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. भटीजा यांनी पैसे पाठविल्यानंतर सिमेंट येथून पाठविल्याचे सौरभ सिंग व नितीन सिंग यांनी भटिजा यांना सांगितले. दरम्यान ऑर्डर व पैसे देऊनही सिमेंट न आल्याने, मनात पाल चुकचुकली. त्यांनी अंबुजा जिल्हा डीलर यांच्याशी संपर्क करून सौरभ सिंग व नितीन सिंग याबाबत विचारणा केली. तसेच झालेला प्रकार सांगितला.
अंबुजा सिमेंट डीलर मध्ये सौरभ व नितीन सिंग या नावाचे कोणी नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकाराने त्यांना धक्का बसला. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, रंजित रुपचंदानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सौरभ सिंग व नितीन सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस दोन्ही ठगांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस अधिक करीत आहेत.