दोघांनी हात बांधून गळा चिरला; २४ वर्षीय युवकाचा मृतदेह विहिरीत फेकला, संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:45 IST2025-03-26T19:44:43+5:302025-03-26T19:45:15+5:30
तपासात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दोघांनी हात बांधून गळा चिरला; २४ वर्षीय युवकाचा मृतदेह विहिरीत फेकला, संशयित ताब्यात
दिग्रस - मालवाहू तीनचाकी वाहन चालवून कुटुंबाला मदत करणाऱ्या युवकाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्याचे हात बांधून गळा चिरून त्याला विहिरीत फेकण्यात आल्याचे दिसून आले. हा मृतदेह धानोरा येथील विलास शेलकर या शेतकऱ्याच्या विहिरीत मंगळवारी सकाळी सापडला. मयत मुफीद शेख हा २४ वर्षाचा होता, तो कुटुंबीयांसह दिग्रस येथे राहत होता. मुफीद मालवाहू ऑटो चालवून रेतीचा व्यवसाय करायचा. सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून तो बेपत्ता होता.
मुफीद गायब झाल्याचं कळताच कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही अखेर मंगळवारी सकाळी धानोरा येथील शिवारात विहिरीमध्ये हात बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी गेले. मृतदेहाची ओळख पटवून तो मुफीदचा असल्याचं स्पष्ट झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नेमका कोणत्या कारणावरून मुफीदचा खून झाला याचा शोध घेऊन पोलीस आरोपीचा माग काढत होते.
तपासात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुफीदचा गळा चिरण्यासह मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागावरही चाकूने वार केल्याचे दिसून आले. विहिरीच्या परिसरात रक्त सांडलेले आहे. मुफीदची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आला असावा. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतरच मुफीदच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.
प्रेम प्रकरणातून हत्या?
मुफीदची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. सोमवारी रात्री मुफीद हा संशयित समीर बेग आणि जुनेद या दोघांसोबत होता. त्या दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी हत्येची कबुली देत प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचे सांगितले. मुफीदला पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरूनच पुढील तपास केला जात आहे.