सोन्याची विट खरेदी करण्याच्या नादात व्यवसायिकाला २१.८० लाखांचा चुना

By गौरी टेंबकर | Published: March 12, 2024 04:15 PM2024-03-12T16:15:24+5:302024-03-12T16:15:47+5:30

सांताक्रुझ पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

21 80 lakhs looted to a businessman for buying gold bars mumbai crime news | सोन्याची विट खरेदी करण्याच्या नादात व्यवसायिकाला २१.८० लाखांचा चुना

सोन्याची विट खरेदी करण्याच्या नादात व्यवसायिकाला २१.८० लाखांचा चुना

मुंबई: शेतीत नांगर चालवताना सोन्याची वीट मिळाली असून ती कमी किमतीत विकण्याच्या नावे एका व्यावसायिकाला २१.८० लाखांचा चुना लावण्यात आला. या विरोधात त्यांनी सांताक्रुज पोलिसात तक्रार दिल्यावर संबंधित कलमा अंतर्गत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार मोहम्मद तहसीन खान (४४) यांचे कार दुरुस्तीचा व्यवसाय असून सध्या ते अंधेरी पूर्व परिसरात कंत्राटी पद्धतीवर काम करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर, २०२२ मध्ये त्यांच्या शास्त्रीनगर येथील कार गॅरेजवर राजू अली नाव सांगणारा व्यक्ती आला. त्याला ऑटोमोबाईल मेकॅनिकलचे काम शिकायचे असल्याचे त्याने सांगितल्याने खान यांनी त्याला त्याच्या गॅरेजवर काम करायला सांगितले. मात्र तो दुसरीकडे बिगारीचे काम करत असून ते संपल्यानंतर गावी जाणार असल्याचे म्हणाला आणि त्याने खान यांचा नंबर घेतला. नंतर २ डिसेंबर, २०२३ मध्ये त्याने खान यांना फोन करत त्याच्या शेतात नांगर चालवताना त्याला २.५ किलो सोन्याचे वीट मिळाली असून ती खरेदी करण्यासाठी कोणी इच्छुक असल्यास तो ती स्वस्त दरात देईल असे सांगितले.

सॅम्पल पाहण्यासाठी खान पश्चिम बंगालला गेले तेव्हा अलीने त्याचा भाऊ राजू आणि बाबुल दास यांची ओळख करून दिली. राजूकडे असलेल्या वीटेचे काही तुकडे खान यांनी काढून घेत नंतर मुंबईत सोनाराकडे तपासले. जे २२ कॅरेट सोने असल्याचे त्यांना सांगण्यात आले त्यानुसार ती वीट स्वतः खरेदी करायचे ठरले. अलीने त्यांना विटेची किंमत ३० लाख सांगितली मात्र २२ लाखांवर व्यवहार ठरला. खान यांनी कर्ज उचलले घर हेवी डिपॉझिटला दिले आणि गोल्ड लोन तसेच काही लोकांकडून उधारी घेत २१.५५ लाख रुपये जमवले. त्यापैकी २ लाख घेऊन ते पश्चिम बंगालला गेले आणि आरोपींनी पिवळ्या धातूची वीट त्यांच्या हातात दिली. त्यानंतर गोल्ड ताब्यात मिळाले असून उर्वरित पैसे राजूच्या खात्यात पाठव असे त्यांनी पत्नीला सांगितले. मात्र पुन्हा मुंबईत परतल्यावर त्यांनी वीट तपासली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यांनी आरोपींना फोन केल्यावर जाणून-बुजून त्यांनी खोटी वीट दिली असून अजून २६ लाख रुपये दिल्यास मी वीट देईन असे ते म्हणाले. त्यानंतर त्याने फोन घेणे बंद केले आणि फसवणूकप्रकरणी खान यांनी सांताक्रुज पोलिसांकडे तक्रार केली.

Web Title: 21 80 lakhs looted to a businessman for buying gold bars mumbai crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.