भांड्यांच्या दुकानात २ कामगारांमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा; एकाचे डोके फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 07:11 IST2022-09-11T07:10:52+5:302022-09-11T07:11:16+5:30

राज्यातील किंवा देशातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ठिकठिकाणी चर्चा सुरू असते. चर्चेदरम्यान तर्कवितर्क लावले जातात. चर्चेतील एखादा मुद्दा पचनी पडला नाही, तर वाद विकोपाला जातो.

2 workers in pottery shop discuss political situation; One broke his head | भांड्यांच्या दुकानात २ कामगारांमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा; एकाचे डोके फोडले

भांड्यांच्या दुकानात २ कामगारांमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा; एकाचे डोके फोडले

कल्याण : भांडी विक्रीच्या दुकानात देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरू असताना ती विकोपाला गेली. त्यात एका दुकानातील कामगाराने दुसऱ्या दुकानातील कामगाराला कुकरचे झाकणच डोक्यात फेकून मारले. या घटनेत धीरज पांडे हा तरुण जखमी झाला आहे. हल्ला करणारा दुसरा तरुण मनीष गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

राज्यातील किंवा देशातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ठिकठिकाणी चर्चा सुरू असते. चर्चेदरम्यान तर्कवितर्क लावले जातात. चर्चेतील एखादा मुद्दा पचनी पडला नाही, तर  वाद विकोपाला जातो.  कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडी विक्रीच्या बाजारपेठेत एका दुकानात यु-ट्यूब चॅनलवर दाखविल्या जाणाऱ्या राजकीय विषयावर चर्चा सुरू होती. देशावर किती कर्ज आहे? बजेट काय मांडले आहे? नेमकी काय परिस्थिती आहे? ही चर्चा सुरू असताना धीरज हा काही जणांसोबत चर्चा करीत होता. या चर्चेत कामगार मनीष हा देखील सहभागी झाला होता. 

धीरजने जो मुद्दा चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला. तो मनीषला पटला नाही. मनीषने थेट कुकरचे झाकण उचलून धीरजच्या डोक्यावर मारले. यात धीरज हे जखमी झाले. बाजारपेठ पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मनीष याला ताब्यात घेतले आहे. जखमी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल करावी, यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ आणि राणी कपोते यांनी पुढाकार घेतला. 

Web Title: 2 workers in pottery shop discuss political situation; One broke his head