शीख विरोधी दंगल: काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना दिलासा, न्यायालयाने जामीनपत्र स्वीकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 15:05 IST2023-08-05T15:02:10+5:302023-08-05T15:05:06+5:30
जामीन आदेशात घातलेल्या अटींच्या अधीन राहून हे स्वीकारले जात आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले

शीख विरोधी दंगल: काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना दिलासा, न्यायालयाने जामीनपत्र स्वीकारले
Anti Sikh Riots, Jagdish Tytler: शीखविरोधी दंगलीतील 1984 च्या पुल बंगश हत्येशी संबंधित खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना दिलासा देत, जामीनपात्र जातमुचलका स्वीकारला. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी विधी गुप्ता आनंद यांनी सांगितले की, आरोपीला याआधीच सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यामुळे हे निर्देश देण्यात आले. टायटलर यांच्या आरोपपत्राची प्रत देण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले.
काँग्रेस नेते टायटलर कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर झाले. त्यांची पत्नी जेनिफर टिटोर त्यांची जामीन बनली. न्यायालयाने जेनिफरची ओळख आणि आर्थिक स्थितीची पडताळणी केली. तसेच ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे पाहून तिला जामीनदार म्हणून स्वीकारले. दंडाधिकारी म्हणाले, 'जामीनपत्र सादर केले आहे. जामीन आदेशात घातलेल्या अटींच्या अधीन राहून हे स्वीकारले जाते.' या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
न्यायालयाने काँग्रेस नेत्यावर घातल्या अटी
सत्र न्यायालयाने शुक्रवारी टायटलरला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेची जामीन देण्यावर दिलासा दिला. कोर्टाने काँग्रेस नेत्याला काही अटी देखील घातल्या. ज्यात तो या खटल्यातील पुराव्यांशी छेडछाड करणार नाही किंवा त्यांच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही या प्रमुखे गोष्टी आहेत. मॅजिस्ट्रेट कोर्टाने 26 जुलै रोजी टायटलरला 5 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले. या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने हा आदेश दिला. 1 नोव्हेंबर 1984 रोजी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केल्याच्या एका दिवसानंतर, येथील पुल बंगश भागात तीन लोक मारले गेले होते आणि गुरुद्वाराला जाळण्यात आले होते.