19-Year Old Teenager Stabs Rapist To Death In Self-Defence in Tamilnadu | चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं; आरोपीचा मृत्यू

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं; आरोपीचा मृत्यू

नवी दिल्ली: एका १९ वर्षीय तरुणीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. चाकूचा धाक दाखवून या १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणाचा या सर्व झटापटीमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. 
 
तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणाने दाखवलेला चाकूनेच त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी धाव घेतली असता तिथे या तरुणाचा मृतदेह त्यांना आढळून आला. शवविच्छेदनासाठी हा मृतदेह स्टेनली रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तरुणी राहणाऱ्या लोकवस्तीपासून काही अंतरावर असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये शौचासाठी गेली होती. त्यानंतर तिच्याच गावात राहणारा २४ वर्षीय मुलगा तिचा पाठलाग करत असल्याचे तिला जाणवले. त्यानंतर तरुणी खूप घाबरली. ही मुलगी पुढे काही करण्याआधीच या तरुणाने तिच्या गळ्यावर चाकू ठेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे या मुलीने पोलिसांना सांगतिले. त्यानंतर तरुणीने मला जाऊ दे, मी कोणालाही काहीही सांगणार नाही अशी विनंती केली. हा तरुण स्वत:चे कपडे काढू लागला तेव्हा या मुलगी त्याच्याकडे गयावया करु लागली. मात्र तो काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

तरुणीला यानंतर तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने त्याला जोरात धक्का दिला. हा तरुण जवळच्या झाडावर आदळला तेव्हा त्याच्या हातातील चाकू खाली पडला. पडलेला चाकू उचलून या मुलाने तरुणाच्या गळ्यावर अनेकदा वार केले. या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास ही तरुणी स्वत:च स्थानिक पोलीस स्थानकात पोहचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या या कृत्याचं सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे. 

पोलीस उपअधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी दहाव्या इयत्तेच्या परिक्षेची तयारी करत आहे. तसेच आरोपीला दोन मुलं असून तो या तरुणीच्या मावशीचा मुलगा होता. घरगुती वादामुळे काही महिन्यांपूर्वीच अजितकुमार त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. आरोपी तरुण हा बेरोजगार आणि दारुचा व्यसन असलेल्यांपैकी होता. यापूर्वीही त्याच्याविरोधात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: 19-Year Old Teenager Stabs Rapist To Death In Self-Defence in Tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.