19 वर्षाच्या सराईत गुन्हेगाराला अटक; पोलिसांनी 6 मोबाईल केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:12 IST2021-08-19T14:10:43+5:302021-08-19T14:12:34+5:30
Crime News : शहरी व ग्रामीण भागात घरफोडी आणि चोरीचे सत्र सुरू असून यादरम्यान तमन हा टिटवाळा येथील गायकवाड चाळीतील आपल्या घरात लपून बसल्याची माहिती कल्याण क्राईम ब्राँचला मिळाली.

19 वर्षाच्या सराईत गुन्हेगाराला अटक; पोलिसांनी 6 मोबाईल केले जप्त
कल्याण - कल्याण डोंबिवलीतील शहर पोलीस तसेच लोहमार्ग पोलिसांना गेल्या अनेक दिवसांपासून चकवा देणाऱ्या एका 19 वर्षीय सराईत गुन्हेगाराला अखेर कल्याण क्राईम ब्राँचने अटक केली आहे. तमन उर्फ नरेंद्र बाबू भंडारी (वय - 19) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव असून चौकशीदरम्यान त्याच्याकडून 6 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातही तमनवर चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरी व ग्रामीण भागात घरफोडी आणि चोरीचे सत्र सुरू असून यादरम्यान तमन हा टिटवाळा येथील गायकवाड चाळीतील आपल्या घरात लपून बसल्याची माहिती कल्याण क्राईम ब्राँचला मिळाली. पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर, ज्योतिराम साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के व टीमने तमनच्या घराभोवती सापळा रचून त्याला अटक केली.
चौकशीदरम्यान त्यांच्याकडून 38 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या गुन्हेगाराला चोरीच्या मोबाईल सह मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. मानपाडा पोलिसांच्या चौकशीनंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांकडूनही त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.