वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 19:18 IST2021-05-04T19:18:35+5:302021-05-04T19:18:59+5:30
Drugs Case : रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा गांजा जप्त; दोन महिलांना ठोकल्या बेड्या
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरु असताना वर्ध्यात विक्रीसाठी आणलेला १६ लाखांचा सुमारे दीडशे किलो गांजा रामनगर पोलिसांनी शांतीनगर परिसरातून जप्त केला. यावेळी दोन महिलांनाअटक करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांनी दिली. सलग दुसऱ्या दिवशी रामनगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.
पूजा हरिश मोहीते रा. वरुड आणि ज्योती पद्माकर जायदे रा. शांतीनगर असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याचे पथक शांतीनगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावर असलेल्या सेवन टू सेवन या हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात दोन महिला संशयास्पदरित्या बसून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारला असता दोन्ही महिलांजवळ सात पोती दिसून आली. पोलिसांनी त्या सातही पोत्यांची तपासणी केली असता गांजा आढळून आला. दरम्यान पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींना अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक, पाेलीस उपनिरीक्षक पुंडलिक गाडवे, नीलेश घरडे, संदीप खरात, राजू अकाली, राहुल दुधकोहळे, पंकज भरणे, लोभेश गाडवे यांनी केली.