१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 08:10 IST2025-12-17T08:10:55+5:302025-12-17T08:10:55+5:30
अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलीस आणि समाज दोघांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या महिनाभरात १५ दिवसांत जवळपास १४ हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. ज्यात पोलिसांनी गुन्हे नोंद करत तपास सुरू केला आहे. दिल्लीतील या वाढत्या गुन्हेगारीमुळे राजधानीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनांमागे वयस्कच नव्हे तर अल्पवयीन गुन्हेगारांची भूमिकाही समोर आली आहे. पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत.
१७ अल्पवयीन आरोपींचा समावेश
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ हत्यांमध्ये कमीत कमी १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. काही प्रकरणी मुख्य आरोपी अल्पवयीन आहे तर काहींमध्ये गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप आहे. हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय असल्याचे पोलिसांनी म्हटलं. काही घटनांमध्ये घातक शस्त्राचा वापर करून वार करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलीस आणि समाज दोघांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
महिला आणि अल्पवयीनही गेले बळी
या हत्येच्या प्रकरणात बळी गेलेल्यांमध्ये एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यामुळे गुन्ह्याची क्रूरता आणि संवेदनशीलता वाढली आहे. हिंसा कुठल्याही एका वयोगटापर्यंत मर्यादित नाही. गुन्हेगारीमुळे कुटुंबावर खूप खोलवर मानसिक परिणाम पडत आहे. काही प्रकरणात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आली आहे. दिल्लीच्या रोहिणी, पूर्व दिल्ली, शाहदरा, दक्षिण पूर्व दिल्ली आणि उत्तर दिल्लीत घडल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हत्येतील काही घटना नात्यांमधील संबंधित आहेत. काही प्रकरणात शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून हत्या करण्यात आली आहे. एखाद्या विषयावरून झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर हत्येत बदलल्याच्याही घटना आहेत. रागाच्या भरात लोक इतके क्रूर पाऊले उचलत आहेत. कुठल्याही हत्येत एकसारखा पॅटर्न नाही. बहुतांश घटना डोक्यात राग धरून आणि बदल्याच्या भावनेने केल्या आहेत. कुठेही पूर्वनियोजित कट नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून ही वेळ आरोपींवर ओढावली आहे. हत्येत रिक्षाचालक, मजूर, कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी, एका मंदिरातील पुजाऱ्याची बायको यांचा समावेश आहे. त्यातून समाजातील प्रत्येक वर्गात ही गुन्हेगारी फोफावल्याचे दिसून येते.
दरम्यान, हत्येसारखी गुन्हेगारी वाढण्याचं कारण म्हणजे सहजपणे शस्त्रे उपलब्ध होणे, देखरेखीचा अभाव, अंमली पदार्थांचे व्यसन आणि हिंसक वातावरण ही मुख्य कारणे आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे असं सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.