धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:35 IST2025-09-08T15:35:20+5:302025-09-08T15:35:36+5:30

जीआरपी जवान स्टेशनवर अशा प्रवाशांना टार्गेट करतात, जे लांबचा प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांना तपासाच्या नावाखाली ते रोखू शकतात.

13 GRP personnel suspended for robbing railway passengers | धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट

धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट

मुंबई - एक प्रवासी रेल्वेतून त्याचे किंमती साहित्य घेऊन जात होता. स्टेशनवर उतरताच जीआरपी जवानांनी त्याला थांबवले आणि सामान दाखवण्यास सांगितले. त्याला एका खोलीत घेऊन गेले जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तपासात बॅगेतून जे मौल्यवान साहित्य सापडले ते तुझेच असल्याचे सिद्ध कर असं जवानांनी त्याला सांगितले. त्यावर तो प्रवासी घाबरला. त्यानंतर जो प्रकार घडला, तो वरिष्ठांपर्यंत पोहचला. या प्रकरणी जीआरपी जवानांना निलंबित करण्यात आले आहे. 

गेल्या पाच महिन्यांत मुंबईतील जीआरपीने खंडणीच्या आरोपाखाली १३ जीआरपी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर असे प्रकार उघडकीस येत आहेत. जीआरपी आयुक्त राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जीआरपी कर्मचाऱ्यांवरील ही कारवाई वेगाने सुरू आहे. लोकांना त्यांचे सामान फक्त गणवेशधारी कर्मचाऱ्यांकडूनच तपासण्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेल्या ठिकाणीच उघडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रेल्वे प्रशासनाला जिथे जिथे अशा तक्रारी येतात तिथे जीआरपी कारवाई करते. आरपीएफकडेही कोणतीही तक्रार आल्यास ती जीआरपीकडे पाठवली जाते असं रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी म्हटलं. 

जीआरपी जवान स्टेशनवर अशा प्रवाशांना टार्गेट करतात, जे लांबचा प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांना तपासाच्या नावाखाली ते रोखू शकतात. कारण अशा प्रवाशांना सहज लक्ष्य केले जाऊ शकते. मुंबई स्थानकांवर सामानासह उतरल्यानंतर तपासणी दरम्यान रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू आढळल्यास प्रवाशांना अधिकाऱ्याला भेटण्यास सांगितले जात असे. त्यानंतर त्यांना एका खोलीत नेण्यात येते जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तिथे त्यांना रोख रक्कम, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची मालकी सिद्ध करण्यास सांगितले जात असे. हे सामान चोरीचे आहे, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, जेलमध्ये जावे लागेल अशी धमकीही त्यांना देण्यात येते. अनेक प्रकरणांमध्ये मारहाणीचीही नोंद झाली आहे. अशा प्रकारात त्रास टाळण्यासाठी प्रवासी तात्काळ पैसे देण्यास तयार होतात. 

दरम्यान, जीआरपीच्या तपासात असाच एक प्रकार समोर आला. ज्यात राजस्थानातील एक प्रवासी त्याच्या मुलीसह मुंबईत आला होता. त्याला धमकावून ३० हजार रुपये वसूल करण्यात आले. या प्रवाशाने राजस्थानात जाऊन जीआरपीकडे तक्रार केली. या प्रकरणी ३ जवानांना निलंबित करण्यात आले आहे. बऱ्याचदा गोव्यातून स्वस्त दारू आणली जाते, तेव्हा तपासाच्या नावाखाली जवानांकडून ती रोखली जाते, त्यांना जेलला पाठवण्याची भीती दाखवून वसुली केली जात असल्याचे समोर आले आहे. 

Web Title: 13 GRP personnel suspended for robbing railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे