११० खाती, ३० कोटींचे व्यवहार, १२ जणांना अटक; मुंबई पोलिसांकडून सायबर टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:48 IST2025-02-12T06:48:40+5:302025-02-12T06:48:56+5:30
देशभरात ५०९ फसवणुकीच्या तक्रारी, ही रक्कम क्रिप्टोमध्ये रुपांतरीत करत कंबोडियाला पाठविण्यात आली.

११० खाती, ३० कोटींचे व्यवहार, १२ जणांना अटक; मुंबई पोलिसांकडून सायबर टोळीचा पर्दाफाश
मुंबई - गावदेवी पोलिसांनी कंबोडिया देशातून सुरू असलेल्या सायबर टोळीचा पर्दाफाश करत १२ जणांना अटक केली. या टोळीने बँकांमध्ये ११० बँक खाती उघडून त्याद्वारे ३० कोटींचे व्यवहार केल्याची माहिती समोर आली. या बँक खात्याविरुद्ध देशभरात ५०९ तक्रारी नोंद झाल्या आहेत.
गावदेवीतील ७४ वर्षीय वृद्धाला या टोळीने गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचा बहाणा करून एक लाख रुपयांना गंडवले. याप्रकरणी गुन्हा नोंदवत केलेल्या तपासात, फसवणुकीची रक्कम आरोपींनी मोहोळ येथील आरोपी केशव कुलकर्णीच्या बँक खात्यावर जमा केली. पुढे ती पंजाब येथे पाठवत रोख स्वरूपात काढली. ही रक्कम क्रिप्टोमध्ये रुपांतरीत करत कंबोडियाला पाठविण्यात आली.
पोलिस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पथकाने मोहोळ, सोलापूर (९), खारघर (१), गोवा (१) व पंजाब (१) असे १२ आरोपी अटक केले. राजेंद्र सिंग ऊर्फ कुन हॅश, रोमन रेगीन्स ऊर्फ प्रवीण लोंढे, संदीप काकडे, आदित्य कुलकर्णी, अतुल कोळी, फजलेरसुल अहमद, पीयूष अग्रवाल, नामदेव काळे, शिवाजी साळुंके, गुरुविंदर सिंग, सागर ऊर्फ केशव कुलकर्णी, दर्शन म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
...म्हणून ‘लोकेशन’ कोडवर्ड
कंबोडिया येथील फसवणूक करणाऱ्या एच.वाय. पे आणि एच.एन. नावाच्या कंपनीसाठी हे आरोपी काम करत होते, तर मोहोळ, गोवा, पुणे, जयपूर अशा विविध ठिकाणी आरोपींनी बँक खातेदारांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. आरोपींनी त्याला ‘लोकेशन’ असे नाव दिले होते. लोकेशनचे काम हे हॅन्डलर याला दिले होते.
असे चालायचे काम...
अटक आरोपी हे खातेदारांकडून बँक खाती उघडून घ्यायचे. पुढे सर्व बँक खाते स्वत: कंबोडिया येथे कार्यरत असणाऱ्या चिनी वंशाचा लोकांना देत होते. भारतात विविध ठिकाणी बँक खातेदारांना बोलावून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून बँक खात्यांचे किट आणि बँक खात्याला लिंक मोबाइल सिम कार्ड घेत. हे सिम कार्ड अन्य मोबाइलमध्ये टाकून आरोपींनी दिलेले ॲप इन्स्टॉल करत. त्यावर येणारे ओटीपी कंबोडिया देशातील आरोपींना पाठवून सायबर फसवणुकीतील रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करत होते.